नवी दिल्ली DC Vs RR IPL 2024 : आयपीएल हंगामातील 56 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर खेळवण्यात आला. या सामन्यात घरच्या मैदानावर खेळताना दिल्ली संघानं राजस्थान रॉयल्स संघाला 'पाणी पाजलं.' प्रथम फलंदाजी करताना दिल्लीनं 8 गडी गमावून 221 धावा केल्या. अभिषेक पोरेल (65), जेक फ्रेझर-मॅकगर्क (50) यांनी अर्धशतकं झळकावली. या सामन्यात युझवेंद्र चहल यानं इतिहास रचला असून त्यानं टी20 मध्ये 350 बळीचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला.
राजधानी एक्सप्रेस सुसाट :दिल्लीच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करताना वेगवान सुरुवात केली. पोरेल आणि मॅकगर्क यांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. मॅकगर्कनं 20 चेंडूत 7 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीनं 50 धावांची तुफानी खेळी केली. पाचव्या षटकात तो पॅव्हेलियनमध्ये परतला. शाई होप (1) धाव करुन बाद झाला. पोरेलनं अक्षर पटेल (15) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 42 आणि कर्णधार ऋषभ पंत (15) सोबत चौथ्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी केली. पोरेलनं 13व्या षटकात आपली विकेट गमावली. ट्रिस्टन स्टब्सनं केवळ 20 चेंडूत 41 ठोकल्या, यात त्यानं तीन चौकार आणि तीन षटकार लगावले. त्याच्या खेळीच्या जोरावर दिल्लीला 200 धावाच्या पुढं धावसंख्या नेण्यात यश आलं. त्यानं गुलबदिन नायब (19) सोबत सहाव्या विकेटसाठी 45 धावा जोडल्या. रसिक दार सलामनं 9 धावा केल्या. कुलदीप यादव 5 धावा करुन नाबाद राहिला. दिल्लीनं रहाजस्थान रॉयल्स संघापुढं 222 धावांचं विजयी लक्ष्य ठेवलं.
राजस्थान संघाची फलंदाजी ढेपाळली :दिल्ली संघानं दिलेलं 222 धावांच्य विजयी लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान संघाची फलंदाजी ढेपाळली. दिल्लीचा सलामीचा धडाकेबाज फलंदाज यशस्वी जैस्वाल केवळ 4 धावा काढून बाद झाला. तर बटलरही 19 धावांवर असताना तंबूत परतला. त्यानंतर संघाचा कर्णधार संजू सॅमसननं डावाची सूत्रं हाती घेतली. संजू सॅमननं 86 धावांची तुफान फटकेबाजी केली. मात्र त्याचा सीमारेषवर त्याचा शाई होपनं त्याचा झेल टिपला. हा झेल टिपताना शाई होपच्या पायाचा स्पर्श सीमारेषेला लागल्याचा आक्षेप संजू सॅमसननं घेतला, मात्र तिसऱ्या पंचानं त्याला बाद ठरवलं. संजू सॅमसन माघारी परतल्यानंतर रियान परागनं 22 चेंडूत 27 धावा केल्या. मात्र राजस्थानचं बुडणारं जहाज त्याला बाहेर काढण्यात यश आलं नाही. शुभम दुबेही 12 चेंडूत 25 धावा करत तंबूत परतला. त्याच्यानंतर फरेरिया, अश्विन यांनी हजेरी लावण्याचं काम केलं. पॉवेल मोठे फटके मारण्याच्या नादात असताना मुकेश कुमारनं त्याला अखेरच्या षटकात झेलबाद केलं. त्यामुळे राजस्थानचा संघ केवळ 201 धावावर गुंडाळण्यात दिल्लीच्या गोलंदाजांना यश आलं.