नागपूर VID vs KER Final : दानिश मालेवारचे धमाकेदार शतक (138*) आणि करुण नायर (86) यांच्या शानदार खेळीमुळं विदर्भानं केरळविरुद्ध रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी आपलं वर्चस्व गाजवलं. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी विदर्भानं 86 षटकांत 4 गडी गमावून 254 धावा केल्या होत्या. यश ठाकूर (5*) मालेवारसह नाबाद राहिला.
काय म्हणाला दानिश : रणजी ट्रॉफीच्या इतिहासात विदर्भासाठी अंतिम सामन्यात शतक झळकावणारा दानिश मालेवार सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. दिवसाच्या खेळानंतर त्यानं ईटीव्ही भारतशी संवाद साधला. तो म्हणाला, "होम ग्राउंडचा फायदा मिळतो. आम्हाला या मैदानाची चांगली माहिती आहे. तीन-चार वर्षांपासून इथं खेळत आहे. त्यामुळं खेळपट्टीची माहिती आहे. आम्ही 450 धावा करण्याचा प्रयत्न करु. रनआउटमध्ये चुकी कळत नाही, पण ते व्हायला नको होतं."
दानिश मालेवार (ETV Bharat Reporter) मालेवारनं ठोकलं शतक : 24 धावांत तीन विकेट गमावलेल्या विदर्भाला दानिश मालेवार आणि अनुभवी करुण नायर यांनी सावरलं. या दोघांना क्रीजवर स्थिरावण्यासाठी थोडा वेळ लागला आणि नंतर केरळच्या गोलंदाजांना अडचणीत आणलं. 21 वर्षीय मालेवारनं परिपक्वता दाखवली आणि एका उच्च-दबाव असलेल्या सामन्यात शतक झळकावून आपली योग्यता सिद्ध केली. मालेवारनं नायरसोबत 215 धावांची भागीदारी केली. आदित्य सरवटेनं टाकलेल्या डावाच्या 58 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मिडविकेटकडे चौकार मारुन मालेवरनं आपलं शतक पूर्ण केलं. मालेवारचं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे दुसरं शतक होतं. त्यानं 168 चेंडूत 11 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीनं आपलं शतक पूर्ण केलं.
नायर धावबाद :दानिश मालेवार आणि करुण नायर यांनी 215 धावांची भागीदारी करुन विदर्भाला मजबूत स्थितीत आणलं होतं. परंतु या भागीदारीचा दुःखद अंत झाला. आपल्या शतकाकडं वाटचाल करणारा करुण नायर 82व्या षटकात धावबाद झाला. कुन्नुमलनं नायरचा डाव संपवला. करुण नायरनं 188 चेंडूत 8 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 86 धावा केल्या. केरळकडून एमडी निधीशनं 18 षटकांत 33 धावा देत दोन विकेट्स घेतल्या, ज्यात सात मेडन्सचा समावेश होता. एडेन अॅपल टॉमला एक यश मिळालं. त्यानं 21 षटकांत 5 मेडन्ससह 66 धावा दिल्या. दुसऱ्या दिवशी विदर्भाचा संघ मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल तर केरळचा संघ यजमान संघाला लवकर बाद करण्याचा प्रयत्न करेल.
हेही वाचा :
- VID vs KER Final Day 1: पहिल्या दिवशी विदर्भाच्या फलंदाजांचं वर्चस्व; दानिश मालेवारची शतकी खेळी
- टीम इंडियाच्या खेळाडूंच्या मोबाईलमध्ये कोणते वॉलपेपर? स्वतःचं दिली मजेशीर प्रश्नांची उत्तरं