महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Live क्रिकेट सामन्यात चौकार मारताच फलंदाजाचा मृत्यू, क्रिकेट विश्वावर शोककळा - CRICKETER DEATH IN LIVE MATCH

क्रिकेटच्या मैदानातून एक वाईट बातमी समोर येत आहे. एका युवा खेळाडूचा मैदानात लाईव्ह सामन्यातच मृत्यू झाला आहेय

Cricketer Death in Live Match
प्रतिकात्मक फोटो (Getty Images)

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 29, 2024, 11:36 AM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Cricketer Death in Live Match : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कधी काय होईल याचा नेम नाही. मनुष्याच्या आयुष्याची खात्री तर आता कोणालाही देणं शक्य होत नाही. याचाच प्रत्यय छत्रपती संभाजीनगरच्या क्रिकेट मैदानावर पाहायला मिळाला. शहरातील गरवारे क्रिकेट मैदानात सामना दरम्यान अष्टपैलू खेळाडू इम्रान पटेल बॅटिंग करत असताना मैदानातच कोसळला, रुग्णालयात डॉक्टरांनी त्याची प्राणज्योत माळवल्याचं सांगितलं. त्यामुळं जिल्ह्यातील अनेक क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. नेहमी हसत खेळत असणारा आणि आपल्या खेळानं सर्वांची मन जिंकणारा एक खेळाडू अशा पद्धतीनं गेल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

इमरान पटेल (ETV Bharat Reporter)


सामन्यादरम्यान मैदानावरच कोसळला इम्रान : स्थानिक पातळीवरील खेळामध्ये अनेक सामन्यांमध्ये नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या इमरान पटेलनं क्रिकेटच्या मैदानातच अखेरचा श्वास घेतला. बुधवारी सायंकाळी खाजगी स्पर्धांमध्ये तो खेळत असताना, त्यानं आपल्या खेळानं प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानं एक चौकार ठोकला आणि काही वेळातच त्याला त्रास जाणू लागला. त्यानं बाहेर जाऊन औषध घेण्याची गरज असल्याचं अम्पायरला सांगितलं आणि तो पॅव्हेलियनकडे चालू लागला. मैदानाच्या बाहेर पडण्याआधीच तो जागेवरच कोसळला, सर्व खेळाडू त्याच्या दिशेनं धावले तो काहीच बोलत नव्हता. त्यावेळी त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यासाठी यंत्रणा सरसावली.


अष्टपैलू खेळाडूचा मृत्यू : गरवारे मैदानात सुरु असलेला या सामन्यात महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत हे देखील उपस्थित होते. मैदानावर इम्रान कोसळल्याचं पाहून त्यांनी तातडीनं खाजगी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. सायंकाळची वेळ असल्यानं खूप गर्दी रस्त्यावर असेल, त्यामुळं आयुक्तांनी त्यांची पायलट गाडी देखील दिली. मात्र खाजगी रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. इम्रान पटेल हा अष्टपैलू खेळाडू होता. फलंदाजातून धावांचे आकडे वाढवण्यासोबतच गोलंदाजीतही तो चांगली कामगिरी करत असायचा. त्यामुळं स्थानिक पातळीवर त्याचे अनेक चाहते होते. त्याच्या निधनानंतर समाज माध्यमांवर क्रिकेट प्रेमींनी दुःख व्यक्त केलं. त्याच्यावर आझाद कॉलेज येथील पॅसिफिक हॉस्पिटल जवळील कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात आला. त्याच्या पश्चात आई, पत्नी आणि तीन मुली असं कुटुंब आहे. त्याच्या अकाली निधनानं क्रिकेट विश्वावर मात्र शोककळा पसरली आहे.

हेही वाचा :

  1. श्रीलंकेच्या फलंदाजांची 'हाराकिरी'; कसोटी क्रिकेटमध्ये 1904 नंतर पहिल्यांदाचं 'असं' घडलं
  2. 0,0,0,0,0...पाच फलंदाज शुन्यावर आउट, कसोटीत अवघ्या 13.5 षटकांत विश्वविजेत्यांचा खुर्दा

ABOUT THE AUTHOR

...view details