Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. पण भारतीय क्रिकेट संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तान दौरा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. अशा परिस्थितीत ICC नं पाकिस्तानकडे हायब्रीड मॉडेलमध्ये यजमानपदाची मागणी केली आहे. मात्र, या मुद्द्यावर पाकिस्तानकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. PCB नं रविवारी ICC ला ईमेल केल्याची पुष्टी केली होती. ज्यात भारतानं पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याचं म्हटलं आहे.
पाकिस्ताननं बाळगलं मौन : पीटीआयच्या वृत्तानुसार, बातमी समोर आली आहे की जोपर्यंत PCB चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदावरुन माघार घेण्याचा निर्णय घेत नाही, तोपर्यंत भारताचे सामने यूएईमध्ये आणि फायनल दुबईमध्ये आयोजित करण्याची सध्याची योजना आहे. खरंतर, BCCI नं ICC ला सांगितलं आहे की हायब्रीड मॉडेल त्यांना दुबईमध्येच मान्य आहे, पाकिस्तानमध्ये नाही. ICC नं पाकिस्तानला याबाबत माहिती दिली आहे, मात्र त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तथापि, ICC नं पीसीबीला आश्वासन दिलं आहे की हायब्रिड मॉडेल अंतर्गत त्यांना संपूर्ण होस्टिंग फी आणि बहुतेक सामने मिळतील.