मुंबई MCA Election : क्रिकेट विश्वातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. काही दिवसापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली होती. यानंतर मंगळवारी मुंबई क्रिकेट संघटनेची सचिव पदासाठी पोटनिवडणूक पार पडली. यात सचिन तेंडुलकरनं उभा केलेला उमेदवाराला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. यामुळं प्रथमच निवडणुकीत रस घेणाऱ्या सचिन तेंडुलकरला मोठा धक्का बसला आहे. हा निकाल अनपेक्षितरित्या लागल्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे. या निवडणुकीत अजिंक्य नाईक गटाचे अभय हडप यांनी विजय मिळवला आहे.
अभय हडप यांची सूरज सामत यांच्यावर मात : भारतरत्न आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं यापूर्वी कधीही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत रस घेतला नव्हता किंवा सहभाग घेतला नव्हता. मात्र या वेळेस सचिननं उघडपणे सुरज सामत यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पोटनिवडणुकीत पाठिंबा दर्शवला होता. पण सुरज सामत यांना पराभव पत्करावा लागला. मंगळवारी मुंबई क्रिकेट संघटनेच्या पोटनिवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. सचिन तेंडुलकरनं पाठिंबा दिलेल्या सूरज सामत यांचा पराभव झाला. तर सामत यांच्या विरोधात असणारे अभय हडप यांनी 196-141 असा सहज विजय मिळवला. अभय हडप यांच्या विजयानंतर मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी आनंद व्यक्त केला असून, हडप यांच्या विजयामुळं मला समाधान झाल्याची प्रतिक्रिया अजिंक्य नाईक यांनी माध्यमांना दिली आहे. अभय हडप यांचं मैदानावरील क्रिकेटशी नातं घट्ट आहे. 3 दशकांहून अधिक हडप यांचं नातं क्रिकेटशी जोडलेलं आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी दिली.