मुंबई BCCI to Take Big Action Virat Rohit : भारतीय क्रिकेट संघाला मायदेशात झीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-0 असा मानहानीकारक पराभव पत्करावा लागला आहे. या पराभवाची जबाबदारी खुद्द भारतीय कर्णधार रोहित शर्मानं घेतली आहे. मात्र या पराभवामुळं रोहितच्या कर्णधारपदासह त्याची फलंदाजी, विराट कोहलीसह वरिष्ठ खेळाडूंवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ही या ज्येष्ठ खेळाडूंवर कारवाई करण्याच्या मनस्थितीत असल्याचं दिसत आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं केली होती कारवाई : मागिल महिन्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डानंही (PCB) इंग्लंड विरुद्ध पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर संघातील बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी या दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर पाकिस्तान संघानं उर्वरित दोन्ही सामन्यांत विजय मिळवत 2-1 नं मालिका जिंकली होती. BCCI देखील हाच कित्ता गिरवण्याची शक्यता आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्याचा मार्ग खडतर : न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावरुनही घसरला आहे. याशिवाय अंतिम फेरी गाठण्याचा मार्गही खडतर झाला आहे. आता भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचं आहे, जिथं त्यांना 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही ऑस्ट्रेलियन मालिका कर्णधार रोहित, कोहली, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विनसाठी शेवटची असू शकते. पीटीआयनं आपल्या अहवालात हा दावा केला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कोणताही बदल नाही : न्यूझीलंडविरुद्धची तिसरी कसोटी पराभूत झाल्यानंतर कर्णधार रोहितनं आपल्या भविष्याबद्दल सांगितलं की, 'सध्या मी फार पुढचा विचार करत नाही.' रोहित पुढं म्हणाला, 'आम्ही ऑस्ट्रेलियाच्या पुढील मालिकेवर लक्ष केंद्रित करणं खूप महत्त्वाचं आहे. आम्ही ऑस्ट्रेलिया मालिकेशिवाय इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करणार नाही. ती मालिका सध्या माझ्यासाठी महत्त्वाची आहे. आम्ही त्यावरच पूर्ण लक्ष केंद्रित करू.' तसंच ऑस्ट्रेलिया मालिका अगदी जवळ आली असून संघाची घोषणा आधीच झाली आहे. अशा परिस्थितीत आता कोणताही बदल होणार नसल्याचही पीटीआयच्या अहवालात म्हटलं आहे.
2011 प्रमाणे यावेळीही होऊ शकते कारवाई : 2011 नंतर सिनियर खेळाडूंना संघातून बाद केल्यावर असाच प्रकार घडला. त्यानंतर संघात युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला. अशा स्थितीत या वेळीही अशीच योजना होऊ शकते. मात्र, यासाठी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांना या विषयावर चर्चा करावी लागणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 4-0 असा विजय मिळवावा लागेल. यात संघ एकही सामना हरला तर संघ WTC फायनलमधून बाहेर पडू शकतो. जर भारत या सायकलसाठी पात्र ठरला नाही तर पुढील सायकल पुढील वर्षी 20 जूनपासून इंग्लंडमध्ये 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेनं सुरु होईल. अशा परिस्थितीत संघाचा पाया रचू शकतील अशा खेळाडूंची निवड समितीला करावी लागणार आहे.
हेही वाचा :
- 2 चेंडूत 3 विकेट... क्रिकेटच्या इतिहासातील अजब विक्रम, 'या' खेळाडूंनी केला अनोखा कारनामा
- साहेबांचा पराभव केल्यानंतर पाकिस्तान कांगारुंनाही हरवणार? पहिला वनडे 'इथं' पाहा लाईव्ह