हैदराबाद Jay Shah on IPL : भविष्यात कसोटी क्रिकेट टिकवण्यासाठी विशेष निधी तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्ये (आयसीसी) चर्चा सुरु असल्याचं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी सांगितलं.
कसोटी क्रिकेटसाठी विशेष निधी : शाह यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, 'मी ICC च्या F&CA (फायनान्स आणि कमर्शियल अफेअर्स) चा सदस्य आहे. कसोटी क्रिकेटसाठी समर्पित निधी असावा असं मी सुचवलं आहे. कसोटी सामने आयोजित करणं खूप महाग आहे. जर (ICC) बोर्डानं मान्यता दिली तर आम्ही ते करु शकतो. आम्ही कसोटी क्रिकेटसाठी खास निधी तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत.
कसोटी दोन दिवसांत पूर्ण झाल्यानंतर परतावा मिळत नाही : भारत घरच्या मैदानावर जास्त दिवस-रात्र कसोटी खेळत नाही. कारण त्या दोन दिवसांत संपतात आणि प्रेक्षक तसंच प्रसारकांना त्याचा फायदा होत नाही. भारतानं घरच्या मैदानावर 3 दिवस-रात्र कसोटी खेळल्या आहेत, ज्या तीन दिवसांपेक्षा कमी कालावधीत संपल्या. भारतानं मार्च 2022 मध्ये बेंगळुरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर शेवटची दिवस-रात्र कसोटी खेळली, ज्यात 238 धावांनी विजय मिळवला होता. प्रेक्षक आणि प्रसारकांचं नुकसान होत आहे. शेवटी त्यांच्या भावनांचाही विचार करायला हवा. एक चाहता म्हणून, जर तुम्ही 5 दिवसांसाठी तिकीट खरेदी करत असाल आणि जर सामना दोन दिवसात संपला, तर परतावा मिळणार नाही. मी या समस्येबद्दल खूप भावनिक असल्याचं शाह म्हणाले.
महिला जागतिक कसोटी चॅम्पियनशिप :महिला क्रिकेटसाठी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सुरु करण्याच्या शक्यतेबद्दल विचारलं असता शाह म्हणाले, सर्व देश कसोटी क्रिकेट खेळले तरच हे शक्य होईल. हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा सर्व देश कसोटी क्रिकेट खेळू लागतील, समस्या अशी आहे की भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडशिवाय इतर संघ कसोटी खेळत नाहीत. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात नुकतीच कसोटी खेळायला सुरुवात झाली आहे. जेव्हा सर्व देश कसोटी खेळू लागतील तेव्हा गोष्टी पुढं सरकतील.
इम्पॅक्ट प्लेयरचा नियम कायम राहणार की नाही : इम्पॅक्ट प्लेअर नियम आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये तो सुरु ठेवला जाईल की नाही याबद्दल बोलताना शाह म्हणाले, 'आम्ही फ्रँचायझी मालकांसोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत याबद्दल दीर्घ चर्चा केली. आमच्या देशांतर्गत संघांमध्येही आमची दीर्घ चर्चा झाली. यात नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही बाजू आहेत. नकारात्मक म्हणजे त्याचा अष्टपैलू खेळाडूंवर परिणाम होतो आणि सकारात्मक म्हणजे अतिरिक्त भारतीय खेळाडूला संधी मिळते. प्रसारकांचाही विचार करायला हवा. प्रशासक म्हणून खेळ माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. बघूया काय प्रतिसाद मिळतात,' असं शाह म्हणाले.
आयपीएल 2025 मेगा लिलाव : बीसीसीआय मेगा लिलावासाठी सर्व घटकांचा विचार करेल असं सांगून शाह शेवटी म्हणाले, 'आम्ही सर्व फ्रँचायझींचे मत ऐकलं आहे. आपल्यासाठी सर्वांचं मत हे महत्त्वाचं आहे. त्यामुळंच (बीसीसीआय) अधिकारीच निर्णय घेतील. ज्यांच्याकडे चांगली टीम आहे त्यांना मोठ्या लिलावाची गरज नाही आणि ज्यांची टीम चांगली नाही त्यांना मोठा लिलाव हवा आहे. खेळाच्या विकासासाठी बदलासोबत सातत्यही महत्त्वाचं आहे,' असं शाह म्हणाले.
हेही वाचा :
- स्वातंत्र्यदिनी सुरु होणार 2 मोठ्या क्रिकेट स्पर्धा; भारतीय संघाचे 'हे' दिग्गज खेळणार, राहुल द्रविडचा मुलगाही उतरणार मैदानात - Maharaja Trophy
- पदार्पणाच्याच सामन्यातच 'या' भारतीय गोलंदाजानं घेतल्या 5 विकेट; संघाला मिळवून दिला एकहाती विजय - Northamptonshire