मुंबई BCCI 10 Rules : गेल्या काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. भारतीय संघानं आधी श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका गमावली, नंतर मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका गमावली आणि अलीकडेच, ऑस्ट्रेलियाविरुद्ध दारुण पराभवाचा सामना करावा लागला. एवढंच नाही तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान संघातील मतभेदाच्या बातम्याही समोर आल्या. संघाच्या कामगिरीत घसरण आणि ड्रेसिंग रुममधील वादांच्या वृत्तानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ काही कठोर कारवाई करेल अशी अपेक्षा होती. आता एका आढावा बैठकीनंतर, बीसीसीआयनं संघात एकता वाढवण्यासाठी आणि कामगिरी पुन्हा सुधारण्यासाठी 10 कठोर नियम आणले आहेत.
देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य :
भारतीय संघात निवडीसाठी पात्र होण्यासाठी बीसीसीआयनं देशांतर्गत क्रिकेट खेळणं अनिवार्य केलं आहे. या मार्गदर्शक तत्वाचा मुख्य उद्देश म्हणजे सर्व खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटच्या परिसंस्थेशी जोडलेलं राहावं. सामन्यांची तंदुरुस्ती राखण्याव्यतिरिक्त, यामुळं नवीन खेळाडूंना देशातील अव्वल क्रिकेटपटूंशी स्पर्धा करण्याची संधी मिळेल. यातून सूट मिळविण्यासाठी, राष्ट्रीय संघातील खेळाडूंना निवड समितीला आधी माहिती द्यावी लागेल.
कुटुंबासह स्वतंत्रपणे प्रवास करण्यास मनाई :
बीसीसीआयनं सर्व खेळाडूंना सामन्यांपासून ते सराव सत्रांपर्यंत नेहमीच एकत्र प्रवास करणं बंधनकारक केलं आहे. कोणत्याही विशेष कारणास्तव, कुटुंबासह स्वतंत्रपणे प्रवास करण्यासाठी मुख्य प्रशिक्षक, निवड समितीचे अध्यक्ष यांची परवानगी घ्यावी लागेल.
सामानावर मर्यादा निश्चित :
बीसीसीआयनं खेळाडूंच्या सामानाची मर्यादाही निश्चित केली आहे. जर त्यांनी मालिकेदरम्यान मर्यादेपेक्षा जास्त सामान वाहून नेलं तर त्यांना स्वतः खर्च करावा लागेल. बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, 30 दिवसांपेक्षा जास्त कालावधीच्या परदेशी दौऱ्यांसाठी, खेळाडू 5 बॅगा (3 सुटकेस आणि 2 किट बॅगा) किंवा 150 किलो वजनापर्यंत बाळगू शकतात. सपोर्ट स्टाफ 3 बॅगा (2 मोठ्या आणि एक लहान सुटकेस) किंवा 80 किलो वजनासह प्रवास करु शकतो. जर दौरा 30 दिवसांपेक्षा कमी कालावधीचा असेल तर 4 बॅगा (2 सुटकेस आणि 2 किट बॅगा) किंवा 120 किलो वजनापर्यंत परवानगी असेल. सहाय्यक कर्मचारी 2 बॅगा (2 सुटकेस) किंवा 60 किलो पर्यंत वजन वाहून नेऊ शकतात. दुसरा नियम देशांतर्गत मालिकेदरम्यान देखील लागू असेल.
वैयक्तिक कर्मचाऱ्यांवर निर्बंध :
आतापासून, कोणताही खेळाडू मालिकेदरम्यान त्याच्यासोबत त्याचे वैयक्तिक कर्मचारी जसं की शेफ, वैयक्तिक व्यवस्थापक, प्रशिक्षक, सेक्रेटरी किंवा कोणताही सहाय्यक घेऊ शकत नाही. यासाठी त्याला प्रथम बोर्डाची परवानगी घ्यावी लागेल.
सेंटर ऑफ एक्सलन्सला स्वतंत्र वस्तू पाठवणे :
खेळाडूंना बेंगळुरुमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्सला कोणतेही वैयक्तिक सामान किंवा उपकरणं पाठवण्यासाठी संघ व्यवस्थापनाशी बोलावं लागेल. जर कोणताही अतिरिक्त खर्च आला तर तो त्यांना स्वतः करावा लागेल.