मुंबई BCCI on Champions Trophy Uniform : चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून खेळवण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळवण्यात येणारी ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर असेल. म्हणजेच भारतीय क्रिकेट संघ त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळेल, त्याशिवाय इतर सर्व संघ पाकिस्तानचा दौरा करतील. दरम्यान भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जर्सीवर पाकिस्तानचं नाव लिहिण्यास नकार दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर एक नवीन वाद निर्माण झाला. मात्र, आता या मुद्द्यावर बीसीसीआयकडून एक मोठं विधान आलं आहे. सहसा सर्व संघांच्या जर्सीवर स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या देशाचं नाव असते.
भारतीय संघाच्या जर्सीवर असेल पाकिस्तानचं नाव : आयसीसीच्या नियमांनुसार, आयसीसीच्या बॅनरखाली होणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये, सहभागी होणाऱ्या सर्व संघांना स्पर्धेचं नाव, यजमान देशाचं नाव आणि स्पर्धेचं वर्ष लिहिणं बंधनकारक आहे. हे सर्व छातीच्या उजव्या बाजूला लिहिलेलं असावं. यातच आता बीसीसीआयचे नवे सचिव देवजीत सैकिया यांनी आता पुष्टी केली आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान, बीसीसीआय जर्सीशी संबंधित आयसीसीच्या प्रत्येक नियमांचं पालन करेल. म्हणजेच या स्पर्धेचे यजमान असलेल्या पाकिस्तानचं नाव टीम इंडियाच्या जर्सीवर असेल, अशी माहिती त्यांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे.
झाला होता वाद :अलिकडेच पाकिस्तानी माध्यमांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि बीसीसीआयवर टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव छापण्यास नकार दिल्याचा आरोप केला होता. पीसीबीलाही हा मुद्दा आयसीसीकडे घेऊन जायचं होतं. पण बीसीसीआयनं आता या सर्व बातम्या फेटाळून लावल्या आहेत आणि जर्सीशी संबंधित आयसीसीच्या प्रत्येक नियमांचं पालन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं आता याबाबत सर्व बाबी स्पष्ट झाल्या आहेत.
टीम इंडिया दुबईमध्ये खेळणार आपले सामने : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं अधिकृत वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, टीम इंडिया त्यांचे सर्व सामने दुबईच्या मैदानावर खेळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान आयोजित केली जाईल. यात भारतीय संघ 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळेल, तर 23 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान संघाशी सामना करेल, तर 2 मार्च रोजी भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा गट सामना खेळेल. जर टीम इंडिया या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाली, तर ते सामना दुबईच्याच मैदानावर जेतेपदाचा सामना खेळतील.
हेही वाचा :
- CISF जवानाला कोहलीचा सेल्फीसाठी नकार, तिकडे बायको, मुलीला पुढं करुन रोहितचा पोलीस, चाहत्यांसोबत सेल्फी; पाहा व्हिडिओ
- कॅरेबियन संघाविरुद्ध शेजाऱ्यांनी मिळवला पहिलाच विजय; मालिका बरोबरीत