हैदराबाद West Indies vs South Africa Test : कसोटी हा क्रिकेटचा सर्वात लांब आणि मनोरंजक प्रकार आहे. सध्या वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी 17 विकेट गेल्या होत्या. मात्र पाच दिवस चालणाऱ्या कसोटी सामन्यात कधी कधी असं काही विचित्र घडतं ज्याची कोणी कल्पनाही करु शकत नाही. दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात एकीकडे एका दिवसात 17 विकेट गेल्या असताना, मात्र दुसरीकडे 86 वर्षांपूर्वीच म्हणजे 1938 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या ओव्हल कसोटी सामन्यात इतिहास घडला होता. जेव्हा एका इंग्लिश फलंदाजानं ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना रडवलं होतं. या इंग्लिश फलंदाजानं तब्बल 13 तासांपेक्षा जास्त वेळ खेळपट्टीवर घालवला आणि विक्रमी 847 चेंडू म्हणजेच सुमारे 141 षटकं फलंदाजी करताना 364 धावांची मोठी खेळी खेळली होती. या जबरदस्त खेळीची कहाणी अधिक बारकाईनं जाणून घेऊया.
13 तास फलंदाजी करत खेळली 141 षटकं : ही गोष्ट आहे इंग्लंडचा माजी क्रिकेटर लिओनार्ड हटनची, ज्यानं 1938 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक चमत्कारी खेळी खेळली होती. ओव्हलवर झालेल्या या सामन्यात हटननं अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन करत पहिल्या डावात 364 धावा केल्या. मोठी गोष्ट म्हणजे इतक्या धावा करण्यासाठी त्यानं तब्बल 847 चेंडू (141. षटके) खेळले, जे कसोटी सामन्याच्या एका डावात कोणत्याही फलंदाजानं खेळलेले सर्वाधिक चेंडू आहेत. एवढंच नाही तर हटन 797 मिनिटं (सुमारे साडे तेरा तास) क्रीजवर राहिला. हटनच्या या खेळीनं गोलंदाजांचे मनोधैर्य खचलं होतं.
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची केली होती वाईट अवस्था :लिओनार्ड हटन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी (बिल एडरिक 187 धावा आणि जो हार्डस्टाफ नाबाद 169) ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना पूर्णपणे थकवलं होतं. ऑस्ट्रेलियाच्या चक फ्लीटवुड स्मिथनं 87 षटकं गोलंदाजी करत आणि 298 धावा दिल्या. दुसरा सर्वात महागडा गोलंदाज बिल रेली होता, ज्यानं 85 षटकं टाकताना 178 धावा दिल्या. त्यानंच हटनला बाद करुन त्याची खेळी थांबवली. तर मर्विन वेटनं 72 षटकात 150 धावा दिल्या. विशेष म्हणजे गोलंदाजांची झालेली वाईट अवस्था अगदी डॉन ब्रॅडमनलाही बॉलिंग करायला यावं लागलं. ब्रॅडमननं 2.2 षटकात 6 धावा दिल्या. मात्र, त्यांना एकही विकेट मिळाली नाही.