ढाका Squad for West Indies ODI Series : बांगलादेश आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघ यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरु आहे. यानंतर उभय संघांमध्ये वनडे मालिकाही होणार आहे. या मालिकेसाठी बांगलादेशनं आपला संघ जाहीर केला आहे. या मालिकेसाठी बांगलादेशच्या संघात अनेक वरिष्ठ खेळाडू उपस्थित नाहीत. त्यामुळं बांगलादेशचं मोठं नुकसान होऊ शकतं. बांगलादेशचे अनेक खेळाडू जखमी झाले आहेत. या मालिकेतील पहिला सामना 8 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. या मालिकेत एकूण तीन सामने खेळवले जाणार आहेत. संघाला नवा कर्णधार मिळाला आहे.
बांगलादेशचे अनेक खेळाडू जखमी : बांगलादेशनं वनडे मालिकेसाठी मेहदी हसन मिराझची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. दरम्यान, संघाचा नियमित कर्णधार नजमुल हुसेन शांतो दुखापतीमुळं संघाबाहेर आहे. शाकिब अल हसनही संघात नाही. देशासाठी खेळण्याच्या मानसिक स्थितीत नसल्याचं सांगत शाकिब अल हसननं आपल्या अनुपस्थितीचं कारण दिलं आहे. त्यामुळं तो संघाबाहेर आहे. तौहीद हृदयाला फुटबॉल खेळताना पाठीला दुखापत झाली होती, त्यामुळं तो या मालिकेतूनही बाहेर पडला आहे. मुशफिकूर रहीम आणि मुस्तफिजुर रहमान देखील दुखापतीमुळं आणि वैयक्तिक कारणांमुळं निवडीबाहेर आहे. मात्र, नोव्हेंबरमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडलेला लिटन दास या मालिकेत पुनरागमन करत आहे, ही संघासाठी दिलासादायक बाब आहे.