लाहोर Babar Azam :येत्या काही दिवसांतच चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होणार आहे. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या तयारीत सर्व संघ व्यस्त आहेत. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघातील वनडे मालिका सुरु झाली आहे, तर यजमान पाकिस्तान संघही सरावात व्यस्त आहे. पण याआधीच संघाचा स्टार फलंदाज बाबर आझमसोबत एक दुर्दैवी घटना घडली, ज्यामुळं तो अस्वस्थ झाला आहे. बाबर स्पर्धेच्या तयारीत व्यस्त असताना अचानक त्याची एक मौल्यवान वस्तू हरवली. ही सामान्य गोष्ट नाही तर बाबर आझमचा वैयक्तिक मोबाईल फोन आहे.
बाबरनं सोशल मीडियावर दिली माहिती : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बाबर आझमनं गुरुवार 6 फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून सर्वांना आश्चर्यचकित केलं. बाबर आझमनं पोस्ट करुन त्याचा मोबाईल हरवल्याची माहिती दिली. या स्टार फलंदाजानं लिहिलं, "माझा फोन हरवला आहे आणि माझे सर्व संपर्क गेले आहेत. मला तो (फोन) सापडताच, मी सर्वांशी संपर्क साधेन." विशेष म्हणजे बाबर आझमला हा धक्का अशा वेळी बसला आहे जेव्हा तो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीत व्यस्त आहे. आजकाल, बाबरसह संपूर्ण पाकिस्तानी संघ लाहोरमध्ये आपापसात सराव सामने खेळून स्वतःला सुधारण्यात व्यस्त आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानला एक त्रिकोणी मालिकाही खेळायची आहे ज्यात ते दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडशी सामना करतील. ही मालिका 8 फेब्रुवारीपासून लाहोरमध्ये सुरु होईल. बाबरही यासाठी सराव करत आहे.