सिडनी AUSW Beat ENGW in 1st ODI :या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट संघात होणाऱ्या प्रतिष्ठित अॅशेस मालिकेत पुरुष संघ एकमेकांशी भिडणार आहेत. पण त्याआधी महिलांची अॅशेस सुरु झाली आहे. यात दोन्ही संघांमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये सामने खेळले जाणार आहेत. यातील वनडे मालिकेतील पहिला सामना रविवार 12 जानेवारी रोजी खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघानं इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव केला. यासह त्यांनी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लिश संघानं 204 धावा केल्या, ज्याचा पाठलाग ऑस्ट्रेलियानं 38.5 षटकांत केला. अॅशले गार्डनरला तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं.
गोलंदाजांनी केली चांगली कामगिरी :ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील महिला अॅशेस मालिकेचा पहिला सामना सिडनी इथं खेळवण्यात आला. यादरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाची कर्णधार एलिसा हिलीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर, कांगारु संघाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. परिणामी इंग्लंडचा संपूर्ण संघ फक्त 204 धावांवर बाद झाला. किम गार्थनं विकेट घेण्यास सुरुवात केली. तिनं चौथ्या षटकात इंग्लंडची सलामीवीर माया बाउचरला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. यानंतर 13व्या षटकात अॅनाबेल सदरलँडनं टॅमी ब्यूमोंटला बाद केलं. यानंतर इंग्लंड संघ सावरु शकला नाही. त्यांनी नियमित अंतराने विकेट गमावल्या.
अॅशले गार्डनरची घातक गोलंदाजी :सलामीवीरांच्या जाण्यानंतर, अॅशले गार्डनर आणि सदरलँड यांनी मिळून इंग्रजांच्या मधल्या फळीला उखडून टाकलं. परिणामी इंग्लंडनं फक्त 157 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. मात्र खालच्या फळीच्या फलंदाजांनी काहीसा खेळ केल्यानं संघाची धावसंख्या 204 पर्यंत गेली. संपूर्ण संघ 43.1 षटकांत कोसळला. गार्डनरनं 6 षटकांत 19 धावा देत 3 बळी घेतले. तर किम गार्थनं 10 षटकांत 46 धावा देत 2 बळी घेतले, सदरलँडनं 6 षटकांत 42 धावा देत 2 बळी घेतले, अलाना किंगनं 7 षटकांत 35 धावा देत 2 बळी घेतले आणि डार्सी ब्राउननं 7 षटकांत 21 धावा देत 1 बळी घेतला.
ऑस्ट्रेलियाचा लक्ष्य गाठण्यासाठी संघर्ष : इंग्लंडचा संघ 204 धावांवर सर्वबाद झाला. पण त्यांनी हार मानली नाही आणि शेवटपर्यंत लढत राहिले. लक्ष्य लहान असूनही, ऑस्ट्रेलियासाठी पाठलाग करणं सोपं नव्हतं आणि त्यांनी 6 विकेट्स गमावल्या. लॉरेन बेल, लॉरेन फिलर आणि सोफी एक्लेस्टोन यांच्या शानदार गोलंदाजीमुळं सामना रोमांचक दिसत होता. कांगारु संघानंही 164 धावांवर 5 विकेट गमावल्या. पण अॅलिसा हिलीच्या 70 आणि अॅशले गार्डनरच्या 44 धावांमुळं ऑस्ट्रेलियाला सामना जिंकता आला. त्यांनी 38.5 षटकांत सामना सहज जिंकला. गार्डनरला तिच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
हेही वाचा :
- 20 वर्षांच्या वनवासाचा अंत, वीरुनं केली सर्व शस्त्रे सोडून देणाऱ्या अर्जुनासारखी वेशभूषा
- मुलाच्या बॉलिंगवर मारला सिक्स, वडिलांनी घेतला कॅच, पण आई रागावली; पाहा व्हिडिओ