होबार्ट Womens Ashes : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यात महिला अॅशेस होत आहे. यात दोन्ही संघांमध्ये तीन वनडे, तीन T20 आणि एक कसोटी सामना खेळला जाईल. यातील वनडे मालिका खेळली गेली आहे. जिथं ऑस्ट्रेलियन महिला संघानं मालिकेत इंग्लंड महिला संघाला 3-0 नं पराभूत केलं आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघानं तिसरा वनडे सामना 86 धावांनी जिंकला. या सामन्यातील विजयासह, ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा अॅशेस जिंकण्याच्या जवळ पोहोचला आहे.
कसा झाला सामना : दोन्ही संघांमधील हा सामना बेलेरिव्ह ओव्हल इथं आयोजित करण्यात आला होता. जिथं ऑस्ट्रेलियन महिला संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना त्यांनी 50 षटकांत 8 गडी गमावून 308 धावा केल्या. यादरम्यान, ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडू अॅश गार्डनरनं 102 धावांची शानदार खेळी केली. याशिवाय, ताहलिया मॅकग्रा आणि बेथ मूनी यांनी अर्धशतकं झळकावली. ताहलिया मॅकग्रानं 55 धावा आणि बेथ मुनीनं 50 धावा केल्या.
धावांचा पाठलाग करण्यात इंग्लंड संघ अपयशी :या सामन्यात इंग्लंड महिला संघाला 309 धावांचं लक्ष्य गाठता आलं नाही. त्यांचा संघ 42.2 षटकांत 308 धावांवर ऑलआउट झाला आणि इंग्लंडनं सामना गमावला. सामन्याच्या दुसऱ्या डावात, अलाना किंगनं ऑस्ट्रेलियाकडून शानदार गोलंदाजी केली आणि 8.2 षटकांत 46 धावा देत 5 बळी घेतले. याशिवाय मेगन शुटनंही तीन विकेट्स घेतल्या. आता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची T20 मालिका खेळवली जाईल.
ऑस्ट्रेलिया संघ पुन्हा अॅशेस जिंकण्याच्या जवळ : महिला अॅशेस विजेतेपद जिंकण्यासाठी, संघाला तीन वनडे, तीन T20 आणि एक कसोटी सामना खेळावा लागतो. जिथं प्रत्येक वनडे आणि T20 सामना जिंकण्यासाठी 2-2 गुण दिले जातात. तर कसोटी सामना जिंकल्यानं चार गुण मिळतात. या प्रकारे एकूण गुण 16 आहेत. ऑस्ट्रेलियानं 6 गुण मिळवले आहेत. अशा परिस्थितीत, जर ऑस्ट्रेलियन संघानं आगामी T20 मालिकेत एक सामना जिंकला तर त्यांना 8 गुण मिळतील. यानंतर, त्यांनी सामने हरले तरी त्यांना काही फरक पडणार नाही. ते महिला अॅशेस विजेतेपद राखेतील.
हेही वाचा :
- मनू भाकर, डी. गुकेशला खेलरत्न तर मराठमोळ्या स्वप्नीलचाही राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
- 'सुपरस्टार कल्चर' हटवण्यासाठी BCCI 'गंभीर'; खेळाडूंसाठी 10 सूत्री नियमावली