ॲडलेड AUS vs IND 2nd Test : पर्थ कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाला ॲडलेडमध्ये दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दिवस-रात्र कसोटीत ऑस्ट्रेलियानं पुन्हा एकदा आपलं वर्चस्व कायम राखत टीम इंडियाला दणदणीत पराभव केला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या 157 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर टीम इंडियाला दुसऱ्या डावात केवळ 175 धावा करता आल्या. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला केवळ 19 धावांचं लक्ष्य मिळाले, जे यजमान संघानं सहज गाठलं आणि 10 गडी राखून विजय मिळवला. एवढंच नाही तर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये त्यांनी 1-1 अशी बरोबरीही केली आहे. मालिकेतील तिसरा सामना शनिवार 14 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.
तिसऱ्या दिवशीच भारताचा खेळ खल्लास : ॲडलेड ओव्हल मैदानावर झालेल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा खेळ संपला. रविवारी, 8 डिसेंबर रोजी भारतानं 5 विकेट्सवर 128 धावा करत दुसऱ्या डावाला सुरुवात केली. ऋषभ पंत आणि नितीश कुमार रेड्डी क्रीजवर होते. निकाल आधीच स्पष्ट झाला होता पण पंत आणि रेड्डी या निकालासाठी ऑस्ट्रेलियाला दीर्घकाळ वाट पाहतील अशी आशा होती.
सामन्यात भारतीय संघ 200 धावा करण्यात अपयशी : पण असं होऊ शकलं नाही कारण मिचेल स्टार्कनं पंतला लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतवलं. इथून हा सामना जास्त काळ चालणार नाही हे निश्चित झालं आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनं त्याची जबाबदारी घेतली. त्यानं लवकरच रविचंद्रन अश्विन आणि हर्षित राणालाही बाद केलं. त्याचवेळी नितीशनं आपली दमदार कामगिरी सुरु ठेवत काही उत्कृष्ट फटके मारत संघाला 157 धावांच्या पुढं नेत डावानं सामना गमावण्याचा धोका टाळला. मात्र, कमिन्सनं रेड्डीला बाद करत आपले 5 बळी पूर्ण केले. शेवटची विकेट स्कॉट बोलँडची घोतली, ज्यानं पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही टॉप ऑर्डरची महत्त्वपूर्ण विकेट्स घेतली होती. संपूर्ण भारतीय संघ केवळ 175 धावांवर बाद झाला आणि त्यामुळं टीम इंडियाला दोन्ही डावात 200 धावांचा टप्पाही पार करता आला नाही.