ॲडलेड Play Halted due to Floodlights Failure : ऑस्ट्रेलियात क्रिकेट हा मोठा खेळ मानला जातो. तिथं क्रिकेटची जोरदार तयारी सुरु आहे. भारतीय क्रिकेट संघ जेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल तेव्हा या मालिकेतील पाच सामन्यांपैकी दुसरा सामना दिवस-रात्र असेल आणि गुलाबी चेंडूनं खेळवला जाईल, असा निर्णय अनेक महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता. पण या संपूर्ण सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं किती तयारी केली होती, हे पहिल्याच दिवशी तिसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियन संघाची फलंदाजी सुरु असतानाच उघड झालं.
फ्लड लाइट्स झाली अचानक बंद : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात, जेव्हा संध्याकाळी सूर्यास्त होतो आणि फ्लड लाइट्स आवश्यक होते तेव्हा फ्लड लाइट्स दोनदा बंद झाल्याचं दिसून आलं. सामना सुरु होता, हजारो प्रेक्षक मैदानावर लाइव्ह मॅच पाहत होते, करोडो चाहतेही मॅचचा आनंद लुटत होते, इतक्यात अचानक लाईट गेली आणि अंधार झाला. अचानक घडलेल्या प्रकारानं चाहते, खेळाडूही चक्रावून गेले. ही संपूर्ण घटना 18 व्या षटकात घडली, जेव्हा भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणा गोलंदाजी करत होता. एक सोडून सर्व फ्लड लाईट बंद असताना त्याला या षटकातील फक्त दोन चेंडू टाकता आले. यामुळं खेळ अचानक थांबला. काही वेळानं तो पुन्हा सुरु झाला असला तरी सामना विस्कळीत झाला.