मुंबई Vitti-Dandu Maharashtra : विटी-दांडू हा महाराष्ट्राच्या गल्लीबोळात दिसणारा खेळ आहे. सर्वांनी लहाणपणी हा खेळ नक्कीच खेळला असेल. या खेळाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किंवा त्याही आधी झाल्याचं सांगितलं जातं. कारण याचे संदर्भ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही सापडल्याचं बोललं जातं. विटी-दांडू हा खेळ कमीत कमी 4 मुलांचा एक गट खेळतो. हा खेळ ग्रामीण महाराष्ट्रातील सर्व भागांमध्ये लोकप्रिय आहे. तसंच हा खेळ क्रिकेटच्या खेळाची नांदी आहे. यात चेंडूच्या विटी वापरली जाते. विटी-दांडू हे भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. तमिळमध्ये याला किट्टी पुल, बंगालीमध्ये डांगुली, कन्नडमध्ये चिन्नी दांडू, मराठीत विटी-दांडू तर तेलुगुमध्ये गूटी बिल्ला असं म्हणतात.
राष्ट्रीय स्तरावर खेळला जातो विटी-दांडू : विटी-दांडू हा खेळ राष्ट्रीय स्तरावर खेळला जातो. यात प्रत्येक राज्याचे प्रतिनिधित्व करणारे संघ आहेत. जागतिक स्तरावर विटी-दांडूला हळूहळू ओळख मिळत आहे. मात्र महाराष्ट्रात खेळला जाणारा हा सर्वात जुना खेळ आहे. हा खेळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून खेळला जात असून बहुतांशी ग्रामीण भागात लोकप्रिय आहे. या खेळाला चालना देण्यासाठी 2016 मध्ये पालघर जिल्हा असोसिएशनची स्थापना करण्यात आली. विटी-दांडू हा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा खेळ आहे. 2019 मध्ये काठमांडू इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या राष्ट्रीय संघात या संघटनेचे सात खेळाडू होते.
राज्यस्तरीय विटी दांडू स्पर्धा 2023 :श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ पुणे इथं राज्यस्तरीय विटी-दांडू स्पर्धा 29 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण सात जिल्ह्यातील संघ सहभागी झाले होते. यात जालना, बीड, कोल्हापूर, पुणे, पालघर, अमरावती आणि परभणी या सात जिल्ह्यांनी सहभाग घेतला होता. या सर्व प्रतिस्पर्धी संघांना पराभूत केल्यानंतर पालघर जिल्ह्यानं अंतिम फेरीत जालन्याच्या संघाचा पराभव करुन विजेतेपद पटकावलं होतं.
कसा खेळला जातो विटी-दांडू : हा खेळ खेळण्यासाठी खेळाडूंना दोन संघांमध्ये विभागलं जातं. यात हिटर संघ आणि प्रतिस्पर्धी संघ. हा खेळ खेळण्यासाठी एखादी दांडू नावाची एक लांबलचक काठी आणि साधारणपणे विटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लहान टोकांची काठी लागते. दांडूचा वापर लहान विटीला हवेत उडवण्यासाठी आणि जास्तीत जास्त अंतरापर्यंत जाण्यासाठी पुन्हा मारण्यासाठी केला जातो. जर हिटर विटीला झटका देऊ शकत नाही, तर त्यांची पाळी तीन संधींनंतर संपते. हिटरचा स्कोअर विटीला मारलेल्या ठिकाणापासूनचं अंतर आणि ती पडलेल्या ठिकाणावरुन दांडूनं मोजला जातो. तर विरोधी संघाला विटी हवेत असताना विटीला पकडण्याचा प्रयत्न करावा लागतो. जर विरोधी संघाने विटीला पकडलं तर हिटर संघाची पाळी संपते.