कोलकाता IND vs ENG 1st T20I : भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघातील पाच सामवन्यांची T20 मालिका 22 जानेवारीपासून सुरु होणार आहे. यातील पहिला सामना कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघ या सामन्याच्या तयारीत व्यस्त आहेत. दोन्ही संघांमधील T20 मालिकेत एकूण 5 सामने खेळवले जातील. अशा परिस्थितीत या मालिकेत अनेक मोठे विक्रम बनण्याची आणि तुटण्याची शक्यता आहे. या T20 मालिकेत कोणते खेळाडू नवीन इतिहास रचू शकतात ते पाहूया.
अर्शदीप सिंग इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर : भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनं टीम इंडियासाठी 60 T20 डावांमध्ये 95 विकेट्स घेतल्या आहेत. जर या वेगवान गोलंदाजानं त्याच्या नावावर आणखी दोन बळी घेतले तर तो युजवेंद्र चहल (96) ला मागे टाकून T20 क्रिकेट इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनेल. शिवाय, अर्शदीप सिंग T20 मध्ये सर्वात जलद 100 बळी घेणारा गोलंदाज बनण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत कोणत्याही भारतीय गोलंदाजाला T20 मध्ये 100 बळी घेता आलेले नाहीत. आता अर्शदीपला हा सुवर्ण विक्रम रचण्याची संधी आहे.
जॉस बटलर एका खास क्लबमध्ये मिळवेल स्थान : इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरनं भारताविरुद्ध T20 क्रिकेटमध्ये 498 धावा केल्या आहेत. बटलर दोन धावा करताच भारताविरुद्ध T20 मध्ये 500 धावा करणारा इंग्लंडचा पहिला फलंदाज बनेल. निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड मिलर आणि आरोन फिंच यांच्यानंतर तो भारताविरुद्ध 500 T20I धावा पूर्ण करणारा जगातील पाचवा फलंदाज ठरेल.