जामनगर (गुजरात) Jamnagar Royal Family : जामनगर राजघराण्याचे माजी जामसाहेब शत्रूशल्यसिंहजी जडेजा यांनी आज राजघराण्याबाबत महत्त्वाची घोषणा केली. जामनगरचे रहिवासी आणि जाम साहेबांच्या कुटुंबातील सदस्य आणि ज्येष्ठ माजी भारतीय क्रिकेटपटू अजय सिंगजी जडेजा यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आलं आहे. जामसाहेब शत्रूशल्यसिंहजी महाराज यांनी ऐतिहासिक निर्णय घेत विजयादशमीच्या पूर्वसंध्येला अजयसिंहजी जडेजा यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं आहे. विशेष बाब म्हणजे अजय जडेजा हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि कर्णधारही राहिला आहे.
पत्राद्वारे केली घोषणा : शत्रूशल्यसिंहजी जडेजा यांनी गुजराती भाषेत जारी केलेल्या पत्रात लिहिलं की, 'दसरा हा सण त्या दिवशी चिन्हांकित करतो जेव्हा पांडव वनवासातून विजयी झाले होते. या शुभ दिवशी, अजय जडेजानं माझा उत्तराधिकारी होण्याचा अर्ज स्वीकारल्यानं मी माझा संभ्रम दूर केला आहे. मला पूर्ण विश्वास आहे की अजय जडेजा जामनगरच्या लोकांसाठी वरदान ठरेल आणि समर्पणानं त्यांची सेवा करेल. मी त्याचा खूप आभारी आहे.'
वारसाचा इतिहास काय? : सध्याचे जामसाहेब शत्रूशल्यसिंहजी निपुत्रिक आहेत, त्यामुळं अजय जडेजा यांची उत्तराधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. जामसाहेब शत्रूशल्यसिंहजी यांचे वडील दिग्विजय सिंह होते. जे 33 वर्षे जामसाहेब राहिले. त्यांचे काका रणजितसिंहजी यांनी त्यांना दत्तक घेऊन त्यांचा उत्तराधिकारी बनवलं. भारतीय क्रिकेटची देशांतर्गत आणि बहुचर्चित स्पर्धा रणजी ट्रॉफी जामसाहेब रणजित सिंग यांच्या नावानं खेळली जाते. स्वातंत्र्यापूर्वी रणजितसिंग जडेजा हा भारतीय क्रिकेटचा सर्वोत्तम फलंदाज मानला जात होता.