शारजाह AFG vs BAN 1st ODI Update : अफगाणिस्तानचा संघ क्रिकेटमध्ये वेगानं प्रगती करत आहे. अफगाणिस्तान संघासाठी हे वर्ष खूप चांगलं असणार आहे. T20 विश्वचषक 2024 मध्ये ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत केल्यानंतर अफगाणिस्ताननं अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका जिंकून नवा इतिहास रचला होता. आता अफगाणिस्ताननं वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात बांगलादेशला पराभूत करुन एक नवीन कामगिरी केली आहे.
मोहम्मद नबीची मोठी खेळी : वास्तविक, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिका 6 ऑक्टोबरपासून सुरु झाली. शारजाह इथं खेळल्या गेलेल्या या पहिल्या वनडे सामन्यात अफगाणिस्ताननं फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही बाबतीत दमदार कामगिरी केली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्ताननं 35 धावांच्या आत 4 विकेट गमावल्या, परंतु त्यानंतर कर्णधार हशमतुल्ला शाहिदी आणि अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबी यांनी आपल्या संघाला 235 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हशमतुल्ला शाहिदीनं 52 तर मोहम्मद नबीनं 79 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 84 धावा केल्या. अशाप्रकारे बांगलादेशला 236 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य देण्यात अफगाणिस्तान संघाला यश आलं.
गझनफरनं रचला इतिहास :यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेश संघानं 26 षटकांत 3 गडी गमावून 120 धावा केल्या होत्या. यानंतर अफगाणिस्ताननं त्यांचा युवा गोलंदाज अल्लाह गझनफरला गोलंदाजी दिली आणि बांगलादेशचा संपूर्ण संघ पुढील 23 धावांतच गारद झाला. अल्लाह गझनफरनं गोलंदाजी मिळताच बांगलादेशच्या लागोपाठ विकेट घेतल्या. गझनफरनं अवघ्या 6.3 षटकांत 26 धावा देत 6 फलंदाजांना आपले बळी ठरविलं. यासह 18 वर्षीय अफगाण फिरकीपटूनं इतिहास रचला. अल्लाह गझनफर वनडे क्रिकेटमध्ये 6 विकेट घेणारा तिसरा सर्वात तरुण गोलंदाज ठरला. गझनफरनं वयाच्या 18 वर्षे 231 दिवसांत हा पराक्रम केला. वकार युनूस आणि राशिद खान यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो वनडे क्रिकेटच्या इतिहासात तिसरा सर्वात तरुण गोलंदाज ठरला आहे.
वनडे क्रिकेटमध्ये 6 बळी घेणारे सर्वात तरुण गोलंदाज :
- वकार युनूस- 18 वर्षे 164 दिवस
- राशिद खान- 18 वर्षे 178 दिवस
- अल्लाह गझनफर- 18 वर्षे 231 दिवस