शारजाह AFG Beat BAN By 5 Wickets : अफगाणिस्तान क्रिकेट संघानं चमकदार कामगिरी करत बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना जिंकला. या विजयासह अफगाणिस्तानने मालिका 2-1 अशी खिशात घातली आहे. त्यांचा हा सलग तिसरा वनडे मालिका विजय आहे. रहमानउल्ला गुरबाजचं शतक आणि अजमतुल्ला उमरझाईच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर अफगाणिस्ताननं तिसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशचा 5 गडी राखून पराभव केला. अफगाणिस्ताननं मालिकेतील पहिला सामना 92 धावांनी जिंकला होता. यानंतर दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशनं अफगाण संघाचा 68 धावांनी पराभव केला होता.
बांगलादेशनं केल्या 244 धावा : शेवटच्या वनडेबद्दल बोलायचं झाले तर बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 8 गडी गमावून 244 धावा केल्या. महमुदुल्लाह रियादनं सर्वाधिक 98 चेंडूत 98 धावा केल्या. तर अफगाणिस्तानकडून अजमतुल्ला उमरझाईनं सर्वाधिक 4 बळी घेतले. त्याच्याशिवाय मोहम्मद नबी आणि राशिद खान यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
गुरबाजचं विक्रमी शतक : बांगलादेशनं दिलेलं 245 धावांचं लक्ष्य अफगाणिस्ताननं 48.2 षटकांत 5 गडी गमावत गाठलं. सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजनं विक्रमी शतक झळकावले. त्यानं 120 चेंडूत 101 धावांची खेळी खेळली. विशेष म्हणजे गुरबाज मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत शुन्यावर आउट झाला होता. अजमतुल्ला उमरझाईनंही 77 चेंडूत 70 धावा करत संघाच्या विजयात महत्त्वपुर्ण योगदानं दिलं. बांगलादेशकडून नाहिद राणा आणि मुस्तफिजुर रहमाननं प्रत्येकी २ बळी घेतले. तसेच कॅप्टन मिराजला 1 यश मिळाले.