जोहान्सबर्ग AB de Villiers : दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी दग्गज क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स एप्रिल 2018 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याच वेळी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी 2021 च्या आयपीएलमध्ये शेवटचा प्रोफेशनल सामना खेळला. यानंतर त्यानं क्रिकेटला निरोप दिला. पण 19 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी डिव्हिलियर्सनं एक मोठी घोषणा केली आहे. 'मिस्टर 360' या नावानं प्रसिद्ध असलेल्या या महान खेळाडूनं क्रिकेटच्या मैदानावर परतण्याबद्दल बोलून सर्व चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं ही इच्छा व्यक्त केली.
डिव्हिलियर्स कधी परतणार मैदानावर : एबी डिव्हिलियर्सनं अलीकडेच 'रनिंग बिटवीन द विकेट्स' पॉडकास्टमध्ये त्याच्या पुनरागमनाचे संकेत दिले आहे. यात त्यानं पुन्हा क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली. तो कधी मैदानात परतेल हे मात्र निश्चित झालेलं नाही. डिव्हिलियर्स म्हणाला, "मी लवकरच क्रिकेट खेळू शकतो. मात्र, अद्याप काहीही निश्चित झालेलं नाही." यादरम्यान, त्यानं हे देखील स्पष्ट केलं की आता त्याला आंतरराष्ट्रीय किंवा कोणतंही व्यावसायिक क्रिकेट खेळायचं नाही. याचा अर्थ तो दक्षिण आफ्रिकेकडून किंवा आयपीएलमध्ये खेळणार नाही. "मी आरसीबी किंवा दक्षिण आफ्रिका दौऱ्याबद्दल किंवा कोणत्याही गंभीर सामन्याबद्दल बोलत नाही. तर मला अशा ठिकाणी खेळायचं आहे जिथं मी आनंद घेऊ शकेन," असं तो म्हणाला.
डिव्हिलियर्सनं हा निर्णय का घेतला :डिव्हिलियर्स पुन्हा क्रिकेट खेळण्यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे त्याची मुलं. तो म्हणाला की, त्याच्या मुलांच्या दबावामुळं तो असा विचार करत आहे. तसंच डिव्हिलियर्सनं खुलासा केला की तो लवकरच नेटवर जाऊन सराव करेल आणि खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे की नाही हे पाहील. त्याच्या मते, त्याच्या एका डोळ्यात दृष्टी अंधुक आहे पण दुसऱ्या डोळ्यात पूर्णपणे सुधारणा आहे. जर तो गोलंदाजी यंत्रासमोर चांगला खेळण्यात यशस्वी झाला तर तो भविष्याबद्दल निर्णय घेईल. त्याला त्याची मुलं आणि संपूर्ण कुटुंब त्याला खेळताना पाहावं आणि खेळाचा आनंद घ्यावा असं वाटतं.
डिव्हिलियर्सची क्रिकेट कारकीर्द : डिव्हिलियर्सनं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 114 कसोटी सामने खेळले आणि 50.66 च्या सरासरीनं 8765 धावा केल्या. यात त्यानं 22 शतकं आणि 46 अर्धशतकं झळकावली. त्यानं 228 वनडे सामन्यांमध्ये 53.50 च्या सरासरीनं 9577 धावा केल्या, ज्यात 25 शतकं आणि 53 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय, त्यानं 78 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले, ज्यात त्यानं 26.12 च्या सरासरीनं आणि 135 च्या स्ट्राईक रेटनं 1672 धावा केल्या. आयपीएलबद्दल बोलायचं झालं तर, डिव्हिलियर्सनं या स्पर्धेत 184 सामन्यांमध्ये 39.71 च्या सरासरीनं आणि 151 च्या स्ट्राईक रेटनं 5162 धावा केल्या आहेत. यात त्यानं 3 शतकं आणि 40 अर्धशतकं झळकावली. डिव्हिलियर्स आयपीएलच्या पहिल्या तीन हंगामात दिल्ली संघाकडून खेळला, त्यानंतर तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये गेला आणि शेवटपर्यंत याच संघाकडून खेळला.
हेही वाचा :
- IND vs ENG सामन्यात होणार 'हे' मोठे विक्रम; सूर्या-अर्शदीपला इतिहास रचण्याची संधी
- 'फ्री'मध्ये IND vs ENG पहिली T20I मॅच कशी पाहायची? वाचा सर्व अपडेट