महाराष्ट्र

maharashtra

नाशिकचा 'ह्यूमन कॅल्क्युलेटर' आर्यनची कमाल! दुसऱ्यांदा जिंकला 'मेंटल कॅल्क्युलेशन्स वर्ल्डकप' - Mental Calculations World Cup 2024

'मेंटल कॅल्क्युलेशन्स वर्ल्डकप 2024' स्पर्धेत नाशिकचा 14 वर्षीय आर्यन शुक्ल दुसऱ्यांदा विश्वविजेता ठरला आहे. हे यश मिळवत त्याने 'ह्यूमन कॅल्क्युलेटर' बिरुद सार्थ ठरवलं आहे.

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

Published : 4 hours ago

Updated : 1 hours ago

Aaryan Shukla from Nashik wins Mental Calculations World Cup 2024
ह्यूमन कॅल्क्युलेटर आर्यन शुक्ल (ETV Bharat Reporter)

नाशिक Human Calculator Aaryan Shukla :'ह्यूमन कॅल्क्युलेटर' म्हणून प्रसिद्ध असेलला आर्यन शुक्ल यानं जर्मनीमध्ये आयोजित 'मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्डकप 2024' चे विश्वविजेतेपद जिंकत संपूर्ण भारत देशाला अभिमान वाटावा अशी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. आर्यन अवघ्या 14 व्या वर्षी विश्वविजेता झालाय. त्यामुळं सर्वत्र त्याचं कौतुक केलं जातंय. विशेष म्हणजे 2022 मध्ये देखील आर्यननं ही स्पर्धा जिंकली होती. यामुळं सलग 2 वेळा विश्वविजेता होण्याचा पराक्रम करणारा आर्यन हा जगातील सर्वात लहान वयाचा स्पर्धक ठरलाय.

'मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्डकप' ही स्पर्धा दर 2 वर्षांनी जर्मनी येथे आयोजित केली जाते. जगभरातून अवघ्या 40 आघाडीच्या स्पर्धकांची या स्पर्धेसाठी निवड होते. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत वेगवेगळ्या 9 विषयांत सर्व स्पर्धक आपलं कौशल्य दाखवतात. दोन दिवसांनंतर एकूण 900 पैकी सर्वाधिक गुण मिळवणारा स्पर्धक विजेता घोषित केला जातो. यावर्षी ही स्पर्धा 'पॅडरबॉर्न' या शहरातील Heinz Nixdorf MuseumsForum या जगातील सर्वात मोठ्या कॉम्प्युटर संग्रहालयात आयोजित करण्यात आली होती.

नाशिक ह्यूमन कॅल्क्युलेटर आर्यन शुक्ल (ETV Bharat Reporter)

स्पर्धेच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट कामगिरी : आर्यननं या स्पर्धेत 900 पैकी 819.84 गुणांची कमाई करत सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता होण्याचा बहुमान मिळवला. दुसऱ्या क्रमांकावरील बल्गेरियाचा कलोयन गेशव 532.86 तर जपानचा हिको चिबा 455.75 गुण मिळवत तिसऱ्या स्थानावर राहिला. आर्यनचं विजयाचं अंतर 286.98 गुण इतकं असून स्पर्धेच्या 20 वर्षांच्या इतिहासातील हे सर्वात मोठं आहे.

'विश्वविजेता' ठरला : आर्यननं विश्वविजेतेपदासोबतच स्पर्धेतील सर्व प्रकारात विजेतेपद घेत एकूण 6 पैकी 6 सुवर्ण पदक जिंकली. असं स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात कधीही घडलं नव्हतं. विशेष म्हणजे 10 आकडी 10 संख्यांची बेरीज, 8 आकडी संख्या गुणिले 8 आकडी संख्या, 6 आकडी संख्येचे वर्गमूळ आणि 500 वर्षातील कोणत्याही तारखेचा वार सांगणं, या सर्व विषयात आर्यननं नवीन विश्वविक्रम करत संपूर्ण स्पर्धेवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं. याच बरोबर अचानक विचारल्या जाणाऱ्या 500 गुणांच्या Surprise Task मध्ये सुद्धा सर्वाधिक गुण घेत आर्यन 'Most Versatile Calculator' ठरला आहे.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड : आर्यन शुक्लनं मेंटल कॅल्क्युलेशनचा सराव वयाच्या 6 व्या वर्षांपासून सुरु करत आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. 2024 मध्ये इटलीमधील मिलान शहरात आयोजित 'लो शो द रेकॉर्ड' या टीव्ही कार्यक्रमात आर्यननं 5 आकडी 50 संख्यांची बेरीज अवघ्या 25.19 सेकंदांत करत नवीन विश्वविक्रम करत 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये आपलं नाव कोरलं. याचबरोबर वयाच्या 13 व्या वर्षी तो 'ग्लोबल मेंटल कॅल्क्युलेटर्स असोसिएशन'चा 'बोर्ड मेम्बर' निवडला गेलाय.

शासनाकडून दहा लाखांची मदत :आर्यन नाशिकमधील दिल्ली पब्लिक स्कूल मध्ये 9 व्या इयत्तेत शिकत असून मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10 लाख रुपये प्रोत्साहनपर मदत महाराष्ट्र शासनाकडून जाहीर केली होती.


हेही वाचा -

  1. जागतिक ज्युनिअर मेंटल मॅथ्स स्पर्धेत नाशिकच्या आर्यन शुक्लला विश्वविजेतेपद
Last Updated : 1 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details