पर्थ 8 Wickets in 1 Run : सध्या ऑस्ट्रेलियात वनडे चषक खेळवला जात आहे. ज्यात ऑस्ट्रेलियाचे वरिष्ठ आणि युवा खेळाडू खेळत आहेत. यात आज म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि तस्मानिया यांच्यात सामना झाला. या सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाची अत्यंत खराब कामगिरी पाहायला मिळाली. या सामन्यात तस्मानियाचे गोलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये पाहायला मिळाले. त्यामुळं वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघानं अवघ्या एका धावेत 8 विकेट गमावल्या.
वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा 53 धावांत खुर्दा : या सामन्यात तस्मानियानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जे बरोबर असल्याचं सिद्ध झाले. यानंतर प्रथम फलंदाजी करताना वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ अवघ्या 53 धावांत ऑलआऊट झाला. प्रथम फलंदाजी करताना वेस्टर्न ऑस्ट्रेलियानं चांगली सुरुवात केली होती. एक वेळ अशी होती जेव्हा वेस्टर्न ऑस्ट्रेलियाची धावसंख्या एक बाद 53 धावा होती. पण त्यानंतर तस्मानियाच्या गोलंदाजीची अशी त्सुनामी आली की पुढच्या एका धावेतच संघानं 8 विकेट गमावल्या. त्यामुळं वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या 53 धावांत गडगडला.
सहा फलंदाज शुन्यावर आउट : वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना डार्सी शॉर्टनं सर्वाधिक 22 धावांची खेळी केली. याशिवाय संघाच्या 6 फलंदाजांना खातंही उघडता आलं नाही. कर्णधार ॲश्टन टर्नरही 2 चेंडूंचा सामना करुन शून्यावर बाद झाला. तर लान्स मॉरिसनं एकाही चेंडूचा सामना केला नाही आणि तो नाबाद राहिला. केवळ डार्सी शॉर्ट 22 आणि कॅमेरॉन ब्रेनक्रॉफ्ट 14 यांनाच दुहेरी आकडा पार करता आला. ॲरॉन हार्डीनं 7 आणि जोश इंग्लिसनं 1 धावा केल्या. तस्मानियाकडून ब्यू वेबस्टरनं 6 बळी घेतले. कॅट स्टॅनलेकनं 3 आणि टॉम रॉजर्सनं 1 बळी घेतला.