मुलतान PAK vs WI 1st Test : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी, पाकिस्तान क्रिकेट संघ घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजसोबत 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. मुलतान येथील पहिल्या कसोटी सामन्यात पावसामुळं पहिल्या दिवशी उशिरा खेळ सुरु झाला. अशा परिस्थितीत फक्त 41.3 षटकं खेळता आली. पहिल्या दिवसाच्या खेळाअखेर पाकिस्ताननं 4 विकेट गमावून 143 धावा केल्या होत्या. यानंतर, दुसऱ्या दिवशी पाकिस्तान संघ फक्त 230 धावांवर गारद झाला.
पाकिस्तानची फलंदाजी अपयशी : या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. सौद शकील आणि यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान वगळता कोणीही क्रीजवर वेळ घालवण्याची तसदी घेतली नाही. शकीलनं 84 आणि रिझवाननं 71 धावा केल्या, ज्यामुळं पाकिस्तानला पहिल्या डावात 200 पेक्षा जास्त धावा करता आल्या. वेस्ट इंडिजकडून जेडेन सील्स आणि जोमेल वॉरिकन यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. केविन सिंक्लेअरनं 2 तर गुडाकेश मोटीनं एक विकेट घेतली.
वेस्ट इंडिजची पाकिस्तानसमोर शरणागती : पाकिस्तानच्या 230 धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजची सुरुवातही खूपच खराब झाली. अर्धा संघ फक्त 34 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. टेलएंडर्सनी तग धरण्याचा प्रयत्न केला पण पाकिस्तानचे फिरकीपटू नोमान अली आणि साजिद खान यांनी मिळून पाहुण्या संघाला 34.2 षटकांत 137 धावांवर रोखलं. नोमाननं 5 तर साजिदनं 4 विकेट घेतल्या. अबरार अहमदला 1 विकेट मिळाली. यानंतर, पाकिस्तानचा दुसरा डाव सुरु झाला आणि दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस, संघानं 3 विकेट गमावल्यानंतर स्कोअरबोर्डवर 109 धावा केल्या होत्या.