नवी दिल्ली Pitru Paksha 2024 : भारतात सर्व प्रकारचे सण आणि धार्मिक विधी करण्याची परंपरा आहे. आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून पितरांचं स्मरण केलं जातं. यासाठी दरवर्षी गणेशोत्सवानंतर येणाऱ्या भाद्रपदातील पितृपक्षाला (Pitru Paksha) अधिक महत्त्व आहे. यंदा 17 सप्टेंबरपासून 'पितृपक्ष' सुरू झाला आहे.
'या' वेळेत करा पितरांना तर्पण अर्पण: सूर्याला जल अर्पण केल्यानं आणि तर्पण केल्यानं हा श्राद्ध विधी पितरांपर्यंत पोहोचतो असा समज आहे. यासाठी कुतुप काळ, रोहीन काळ आणि अपराह्न काळ असे तीन कालखंड आहेत. कुतुप काळची वेळ 11:36 ते 12:25 पर्यंत आहे. रोहीन काळची वेळ 12:25 ते 1:14 आहे. अपराह्न काल दुपारी 1:14 ते 3:41 पर्यंतचा वेळ आहे. दुपारी 12 वाजता पितरांचं श्राद्ध केलं जातं.
श्राद्धाचे महत्त्व: भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदेपासून येणाऱ्या अमावस्या तिथीला पितरांची तिथी म्हणतात. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा काळ आपल्या पितरांचं स्मरण करण्याचा काळ आहे. त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण, श्राद्ध, पिंड दान आणि इतर धार्मिक विधी केले जातात. मान्यतेनुसार, या काळात पूर्वज आपल्या कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात. पितृपक्षात पितरांना भोजन, दान आणि तर्पण अर्पण करावे. यामुळं कालसर्प, पितृदोषापासून मुक्ती मिळते.
पितृपक्षात श्राद्ध का करावे? :पितृपंधरवड्यामध्ये श्राद्ध केल्यानं रज-तमात्मक कोषांशी निगडित असणार्या पितरांना पृथ्वीच्या वातावरण कक्षेत येणं सोपं जातं. पितृपक्षाच्या काळात पितरं यम लोकातून आपल्या कुटुंबीयांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी मान्यता आहे. यातील एक दिवस श्राद्ध केले असता पितरं वर्षभर तृप्त राहतात. पितृपक्षात आपल्या सर्व पितरांसाठी श्राद्ध घातल्यानं त्यांच्या वासना, इच्छा तृप्त होऊन त्यांना गती मिळते.