हैदराबाद :मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष लक्ष्मी पूजन आज गुरुवार 05 डिसेंबर 2024 पासून सुरू होत आहे. दुसरा गुरुवार 12 डिसेंबर, तिसरा गुरुवार 19 डिसेंबर, चौथा गुरुवार 26 डिसेंबर रोजी आहे.
पूजा कशी करावी?: मार्गशीर्ष गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर चौरंग किंवा पाटावर लाल कापड पसरवून तांदळावर तांब्याचा कलश ठेवा. कलशाला हळदी-कुंकू लावा. कळसाच्या आत पाणी घालून त्यात दुर्वा, नाणं, सुपारी घालावी. कळसाला विड्याची पाने किंवा आंब्याची डहाळी, पंचपत्री कलशावर ठेवा त्यानंतर त्यावर श्रीफळ ठेवा. पाटावरील लाल कपड्यावर तांदूळ पसरवून कलशाची स्थापना करावी. त्यावर लक्ष्मी देवीचा फोटो ठेवा. विडा, खोबरे, फळे, खडीसाखर आणि गूळ ठेवा. त्यानंतर महालक्ष्मीची विधीवत पूजा करून महालक्ष्मीची कथा वाचा, नैवेद्य अर्पण करा.
मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार तारीख
- पहिला मार्गशीर्ष गुरुवार– ५ डिसेंबर २०२४
- दुसरा मार्गशीर्ष गुरुवार – १२ डिसेंबर २०२४
- तिसरा मार्गशीर्ष गुरुवार : १९ डिसेंबर २०२४
- चौथा मार्गशीर्ष गुरुवार : २६ डिसेंबर २०२४
मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व : प्राचीन धार्मिक ग्रंथांनुसार मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यांसाठी विशेष महत्त्व दिलं जातं, त्यामुळं हा महिना शुभ मानला जातो. या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं या महिन्यात पूजेसारखे शुभ कार्य अधिक फलदायी ठरतात. मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळला जातो. असे म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्यानं भक्तांना लक्ष्मी-नारायणाची कृपा प्राप्त होते. देवी लक्ष्मीच्या कृपेनं सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होतं. लक्ष्मी-नारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी नवविवाहित जोडपेही या दिवशी उपवास करतात. त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूनं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं.
(टीप: सदरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, 'ईटीव्ही भारत' यातील माहितीच्या सत्यतेचा दावा करत नाही)
हेही वाचा -
दिगंबराच्या जयघोषात दुमदुमली नृसिंहवाडी, पहा व्हिडिओ