महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

देशभरात आज साजरी होतेय हनुमान जयंती,समर्थ रामदासांनी स्थापित केलेले अकरा मारुती कुठे आहेत? - Hanuman Jayanti 2024 - HANUMAN JAYANTI 2024

शक्तीचा देवता म्हणून ओळखला जाणाऱ्या हनुमानाची आज देशात हनुमान जयंती साजरी होतेय. मारुतीचा जन्म कुठे झाला, याविषयी वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. समर्थ रामदास स्वामींनी राज्यात अकरा मारुती स्थापन केली आहेत. त्यांच्याविषयी जाणून घेऊ.

11 maruti temples places in Maharashtra
11 maruti temples places in Maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 23, 2024, 8:13 AM IST

मुंबई-परकीयांचे सतत आक्रमण होत असताना रयतेला बलोपासनेचं महत्त्व कळावं यासाठी समर्थ रामदास स्वामी यांनी सातारा, कराड, कोल्हापूरसह चाफळ आणि जवळच्या परिसरात 11 ठिकाणी मारुतीच्या मूर्तींची प्रतिष्ठापणा केली. त्यांना अकरा मारुती म्हणून ओळखले जाते. हे अकरा मारुती कोठे आहेत, हे जाणून घेऊ.

  1. चाफळचा वीर मारुती: पुणे-बंगळुरू महामार्गावरील उंब्रजवरून साधारण 11 कि.मी. अंतरावर असलेल्या चाफळ गावात वीर मारुती म्हणून या मारुतीची ओळख आहे.
  2. वीर मारूती: चाफळच्याच श्रीराम मंदिरामागे रौद्र मुद्रेतील मारुतीची मूर्ती आहे. मारुतीच्या पायाखाली दैत्य असलेली मूर्ती आहे.
  3. माजगावचा मारुती: चाफळपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या माजगावच्या वेशीवर घोड्याच्या आकाराचा पाषाण होता. गावकर्‍यांनी आग्रह केल्यामुळे समर्थांनी इ.स. 1650 मध्ये याच पाषाणातून हनुमानाची मूर्ती घडवून प्रतिष्ठापना केली.
  4. शिंगणवाडीचा मारुती: चाफळपासून साधारण एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शिंगणवाडीचा मारुती आहे. या मारुतीला खडीचा मारुती, बालमारुती, चाफळचा तिसरा मारुती, असेही संबोधले जाते. येथे असलेल्या रामघळमध्ये चार फूट उंचीची उत्तराभिमुखी हनुमानाची मूर्ती आहे.
  5. उंब्रजचा मारुती:- कराड तालुक्यातील उंब्रज याठिकाणी समर्थांनी एक मारुती मंदिर बांधून मठाची स्थापना केली. या मंदिरातील मारुतीची मूर्ती दोन फूट उंच आहे.
  6. मसूरचा मारुती: समर्थांनी उंब्रजपासून 10 कि.मी. अंतरावर असलेल्या मसूर याठिकाणी 5 फूट उंचीची मारुती मूर्तीची स्थापना केली. चुन्यापासून तयार केलेली, पूर्वाभिमुखी असलेली ही मारुती मूर्ती 11 मारुतींमध्ये सर्वात विलोभनीय मूर्ती आहे. मंदिराचा सभामंडप 13 फूट लांबी-रुंदीचा असून सहा दगडी खांबांवर मंदिराचे छत आहे.
  7. शहापूरचा मारूती: कराड-मसूर रस्त्यावर मसूरपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या शहापूर फाटाजवळ मारुती मंदिर आहे. अकरा मारुतींमध्ये सर्वात प्रथम या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. सात फूट उंचीच्या या मारुतीला चुन्याचा मारुती असेही म्हटले जाते.
  8. शिराळ्याचा मारुती: नागपंचमीसाठी प्रसिध्द असलेल्या सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील मंदिरात मारुतीची भव्य मूर्ती आहे. सूर्योदयावेळी व सूर्यास्ताला या मूर्तीवर प्रकाश पडतो.
  9. बहे-बोरगावचा मारुती: कराड-कोल्हापूर मार्गावरील पेठवरून साधारण 12 कि.मी. अंतरावर वाळवा तालुक्यात बहे गाव ठिकाण आहे. समर्थांनी नदीच्या डोहात बुडी मारून तिथून मारुतीची मूर्ती बाहेर काढून प्रतिष्ठापना केल्याची आख्यायिका आहे.
  10. मनपाडळेचा मारुती: कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळगड-जोतिबाच्या परिसरात मनपाडळे आणि पारगाव ही दोन्ही गावे आहेत. किणी वडगाव-वाठारवरून पुढे अंबपमार्गे मनपाडळे हे अंतर 14 किलोमीटर आहे. या ठिकाणी पाच फूट उंचीची साधी मूर्ती आणि मंदिर दोन्हीही उत्तराभिमुख आहे.
  11. पारगावचा मारुती: वारणा साखर कारखान्याकडे जाणार्‍या रस्त्यावर असलेल्या नवे पारगावमध्ये 11 मारुतींपैकी सर्वांत शेवटी स्थापन केलेला मारुती आहे. याला बालमारुती किंवा समर्थाच्या झोळीतील मारुती म्हणतात.

अंजनीच्या कुशीत असलेली बालहनुमानाची एकमेव मूर्ती झारखंडमध्ये-पुराणातील माहितीनुसार जगातील सात सप्तचिरंजीवमध्ये हनुमान अथवा मारुतीचा समावेश होतो. चैत्रमास शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमानाचा जन्म झाला. जीवनातील संकट आणि दु:ख दूर व्हावं या भावनेनं भाविक आज हनुमान जयंतीनिमित्त पूजा आणि व्रत करतात. हनुमानाचा जन्म हा दक्षिण भारतात झाला की उत्तर भारतात याबाबत विविध धार्मिक कथा प्रचलित आहेत. एका कथेनुसार हनुमानाचा जन्म झारखंडमधील गुमला येथील अंजन पर्वतावर झाला. हनुमानाच्या आईचे नाव अंजनी यावरून या परिसराला अंजन धाम म्हणून ओळखले जात आहे. या ठिकाणी असलेल्या मंदिरात बालस्वरुपात हनुमानाची मूर्ती आहे. माता अंजनीच्या कुशीत असलेली हनुमानाची देशातील ही एकमेव मूर्ती आहे.

रामायणातही आहे अंजन पर्वताचा उल्लेख-अंजन धामचे मुख्य पुजारी केदारनाथ पांडे म्हणाले, रामायण किष्किंधा कांडमध्ये अंजन पर्वाचा उल्लेख केला होता. अंजन पर्वतावरील गुहेत महादेवाच्या कृपेनं माता अंजनीच्या पोटी रुद्रावतार असलेल्या हनुमानानं जन्म घेतला. अंजन धामपासून सुमारे ३५ किलोमीटर दूर पालकोट पंपा सरोवराचा रामायणातही उल्लेख आहे. येथूनच काही अंतरावर असलेल्या ऋषी मुख पर्वताहाची रामायणात उल्लेख आहे. या ठिकाणी कपिराज सुग्रीवर राहत होते. याच ठिकाणी श्रीराम आणि सुग्रीवर यांची भेट झाली होती. नाशिकच्या अंजनेरी पर्वतावर हनुमानाचा जन्म झाल्याचीदेखील आख्यायिका आहे. या ठिकाणीही हनुमान जयंती साजरी केली जात आहे.

हेही वाचा-

  1. ‘या’ राशींचा मंगळवार ठरेल खास; कौटुंबिक सौख्य मिळेल, वाचा राशी भविष्य - Today Horoscope

ABOUT THE AUTHOR

...view details