छत्रपती संभाजीनगर Chhatrapati Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यानंतर राज्यातील राजकारण तापलंय. या घटनेप्रकरणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली. याच मुद्द्यावरुन सरकारचा निषेध करण्यासाठी मुंबईतील 'गेट वे ऑफ इंडिया' येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आंदोलन केलं. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना - UBT पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter) उद्धव ठाकरे, शरद पवार माफी मागणार का? : "छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी काही प्रश्नांची उत्तरं द्यावी," असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी केलं. "पंडित नेहरू यांनी डिस्कवरीमध्ये महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावर तुम्ही माफी मागणार का? उत्तर प्रदेशात महाराजांचा पुतळा बुलडोझर लावून तोडण्यात आला. त्याबाबत उद्धव ठाकरे, शरद पवार माफी मागणार का?" असा संतप्त सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
काँग्रेसनं चुकीचा इतिहास शिकवला : "एवढी वर्ष काँग्रेसनं लोकांना चुकीचा इतिहास शिकवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली, महाराजांनी सुरत लुटली नव्हती तर तो खजिना घेऊन योग्य त्या लोकांना दिला होता. हा स्वराज्याचा खजिना होता. पण, शिवाजी महाराज सामान्य माणसाची लूट करायला गेले होते, अशा प्रकारचा चुकीचा इतिहास काँग्रेसनं शिकवला. त्यांना माफी मागायला लावणार आहात की, सत्तेसाठी लाचारी स्वीकारणार?" असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
उद्धव ठाकरेंची टीका : "या शिवद्रोही सरकारच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. जनता तुम्हाला माफ करणार नाही. जनतेच्या मनात संताप आहे. तुम्ही माफी कुणाकुणाची मागणार आहात? ज्यांनी पुतळा बनवला आणि ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांची माफी मागणार का?" असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकार आणि पंतप्रधान मोदींना विचारला. "पंतप्रधानांनी माफी मागितली पण त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. पण महाराजांचा अपमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर सरकारने माफी मागितली आहे. आता बस्स झालं. तुमच्या चुकीला जनता माफ करणार नाही," असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केला.
हेही वाचा
- शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक, महायुतीविरोधात 'जोडे मारो' आंदोलन - MVA Jode Maro protest
- 'तेल लावलेला पैलवान' उतरला आंदोलनात; छत्रपती शाहू महाराजांचा हात धरुन शरद पवार आंदोलनात सहभागी, पाहा उत्साह - MVA Protest In Mumbai
- "शिवद्रोही सरकारला 'गेट आऊट' म्हणण्याची वेळ आलीय"- महाविकास आघाडीचा सरकारवर हल्लाबोल - mva jodo maro protest