मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. तसेच नाराज नेते हे बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. अनेक नेते आणि कार्यकर्तेही पक्षबदल करत आहेत. रविवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती आणि युवासेना (शिंदे गटाचे) सचिव दीपेश मात्रे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना (ठाकरे गटात) प्रवेश केलाय. मातोश्री येथे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केलाय. या प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी सर्वांचे स्वागत करत तुम्ही आता मूळ शिवसेनेत आला आहात, त्यामुळं तुमच्यावर कामांच्या जबाबदारीसाठी मी विनंती करणार नाही तर, शिक्षा देणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी उपरोधिकपणे म्हटले आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करताना 'मुख्यमंत्र्यांचं कार्ट' असा उल्लेख करीत टीका केलीय. या प्रवेशावेळी युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे, माजी खासदार विनायक राऊत, वरुण सरदेसाई, तसेच कल्याण-डोंबिवलीमधील पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
आता गद्दारांना थारा नाही...:महाविकास आघाडीच्या काळात आपले अडीच वर्ष सरकार होते. परंतु गद्दारांनी भाजपाच्या नादाला लागून गद्दारी केली आणि आपले सरकार पाडले. आता तिकडे गद्दार जाऊन बसलेत. पण तुम्हाला तिकडे वाईट अनुभव आल्यानंतर आणि तिकडे काय परिस्थिती आहे हे कळल्यावर तुम्ही स्वगृही परतलात. आता तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांच्या मूळ शिवसेनेत आला आहात. आता जे तिकडे गद्दार जाऊन बसलेत, त्यांना मी परत घेणार नाही. जरी आले तरी उमेदवारी देणारच नाही. परंतु तुमच्यासारखे जे निष्ठावंत आहेत, त्यांना मात्र पक्षाचे दरवाजे उघडे असतील. गद्दारांना शिवसेनेत मुळीच थारा देणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी शिंदे गटातील नेत्यांवर केलाय. यावेळी तुम्ही कल्याण-डोंबिवली मतदारसंघातील आहात, थोडंसं आधी आला असता तर आपण या गद्दारांना लोकसभेतच गाडलं असतं. कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघांमध्ये पैसा आणि सत्तेचा गैरवापर केला गेलाय. तिथे जे आता खासदार आहेत, "मुख्यमंत्र्यांचं कार्ट..." हे तिकडे सत्तेचा गैरवापर करताहेत. परंतु तुम्ही आता आल्यामुळं तुमची ताकद विधानसभा निवडणुकीत दाखवून द्या, ते दाखवालच..., अशी मला आशा असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
सत्ता, पैसा विरुद्ध निष्ठावान शिवसैनिक : लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की, कल्याण-डोंबिवली मतदारसंघात आपला जो उमेदवार होता, त्याला चार लाखांपेक्षा अधिक मतं लोकांनी दिली. ज्या मतदारसंघात देशाच्या पंतप्रधानांनी येऊन प्रचार केलाय, पंतप्रधानांनी सभा घेतल्यात, अनेक दिग्गजांनी तिथे सभा घेतल्यात, तिथे आपल्या महिला कार्यकर्त्याला चार लाखांपेक्षा अधिक मतं मिळालीत. ही शिवसैनिकांनी दाखवलेली ताकद आहे. त्या मतदारसंघात एकीकडे सत्ता, पैसा त्याच्याविरुद्ध प्रामाणिकपणे काम करणारा निष्ठावान शिवसैनिक होता हे दिसून आले. परंतु आता दीपेश मात्रे यांच्यासह त्यांचे सहकारी आलेत. ते उत्तम पद्धतीने काम करतील, चांगलं काम आपणाला विधानसभा निवडणुकीत करायचंय, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी दीपेश म्हात्रे यांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केलीय.
हेही वाचाः