मुंबई Lok Sabha Election 2024 : मुंबईत 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडणार आहे. यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. शनिवारपर्यंत प्रचार करता येणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) मुंबईत शुक्रवारी शिवाजी पार्क येथे सभा होणार आहे. त्यापूर्वी त्यांनी मुंबईत पहिल्यांदाच बुधवारी 'रोड शो' केला. या रोड शोला मोठी गर्दी होती. परंतु या रोड शोमुळं वाहतूक कोंडीमुळं मुंबईकरांचे हाल देखील झाले. तर दुसरीकडं शिवसेना (ठाकरे) यांच्यामुळं मोदींना रस्त्यावर उतरावं लागलं असं बोललं जातय.
का मोदींना रस्त्यावर उतरावं लागलं? : मुंबईत शिवसेना आणि मुख्यत: ठाकरे नावाला वलय आहे. मोठ्या प्रमाणात मराठी मतदार हा अनेक वर्षापासून शिवसेनेला मतदान करत आहे. मात्र, आता शिवसेनेत फूट पडल्यामुळं उद्धव ठाकरेंना सहानुभूती असल्याचं चित्र आहे. दुसरीकडं पंतप्रधान मोदी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंवर "नकली शिवसेना..., नकली संतान...," अशी टीका करत आहेत, त्याला उद्धव ठाकरेही आक्रमकपणे प्रतिउत्तर देत आहेत. थोडक्यात काय तर उद्धव ठाकरेंनी मोदींना नमवलं असल्याचं राजकीय जाणकार आणि तज्ञ म्हणत आहेत. मुंबईत भाजपाला आणि मोदींना पराभवाची भीती वाटत असल्यामुळं त्यांनी कधी नव्हे तो 'रोड शो' केला. अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना (ठाकरे गट) यांच्यामुळं मोदींना रस्त्यावर उतरावं लागलं का? काय आहेत कारणे पाहूयात...
मुंबईत मोदींचा पहिलाच 'रोड शो' :2014 ते 2024 या कालावधीत मोदींनी पहिल्यांदाच बुधवारी मुंबईत 'रोड शो' केला आहे. तसंच यापूर्वी त्यांना महाराष्ट्रात कधीही एवढ्या सभा घ्याव्या लागल्या नव्हत्या, जेवढ्या त्यांनी यावेळी मुंबईसह महाराष्ट्रात घेतल्या आहेत. याला कारणे म्हणजे महायुतीच्या विरोधात वातावरण असल्याची माहिती सर्वेच्या माध्यमातून समोर आलीय. दुसरं म्हणजे राज्यात दोन पक्ष फोडाफोडीच्या घटना घडल्या. हे लोकांच्या पचनी पडलेलं नाही असं दिसतंय. कारण 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा युती म्हणून एकत्र निवडणूक लढवली होती. तेव्हा मुंबईतून जी हक्काची आणि अपेक्षित मतं होती, ती मिळणार यात कुठेही भाजपाला शंका नव्हती. म्हणून मोदी किंवा भाजपातील वरिष्ठ नेत्यांना मुंबईत लक्ष घालण्याची आवश्यकता भासली नव्हती. पण आता शिवसेनेत दोन गट पडल्यामुळं वातावरण उलट आहे. उद्धव ठाकरेंना सहानुभूती असल्यामुळं आणि मतांचे गणित पाहता कधी नव्हे ते मोदींना मुंबईत पहिल्यांदाच 'रोड शो' करावा लागला आहे.
... म्हणून मोदींना रस्त्यावर उतरावं लागलं : एकीकडं उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष, पक्षाचे चिन्ह हे गेले आहे. अनेक आमदार, खासदार, पदाधिकारी नगरसेवक हे उद्धव ठाकरेंना सोडून गेले आहेत. जे लोक आहेत त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेकडून दबाव आणला जात आहे. "मोदी उद्धव ठाकरेंची नकली शिवसेना... आणि त्या नकली शिवसेनेचा नकली संतान..." अशी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका करत आहेत. त्याला तोडीस तोड उद्धव ठाकरेही मोदी आणि भाजपावर निशाणा साधत आहेत. उद्धव ठाकरेंच्या सभेला मोठी गर्दी होत आहे. राज्यातील वातावरण हे महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचं सर्वेतून म्हटलं जातंय. दुसरीकडं मुंबई म्हटलं की, शिवसेना आणि ठाकरे हे समीकरण कित्येक वर्षापासून चालत आलंय. मराठी माणूस शिवसेनेलाच मतदान करत आलाय हा इतिहास आहे. ठाकरे आडनाव हे मतदारांवरती प्रभाव टाकू शकते. या सर्व कारणामुळं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सेनेचे जमेची बाजू ठरते. हे मोदी आणि भाजपाच्या नेत्यांच्या लक्षात आल्यामुळं मोदींना कधी नाही ते मुंबईत पहिल्यांदाच 'रोड शो' करावा लागला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.