नागपूर : प्रभु श्रीरामच्या पावन पदस्पर्शानं पुनीत झालेल्या रामटेकचा 'गड' कोण सर करणार याकडं नागपूरचं नाही तर राज्याचं लक्ष लागलय. विधानसभा निवडणुकीची घोषणा होताचं भारतीय जनता पार्टी पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात चढाओढ सुरू झालीय. तर काँग्रेस पक्षानं आद्यप आपले पत्ते मात्र उघडलेले नाहीत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये रामटेक मतदारसंघातील जनतेनं एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला नाकारलं. त्यामुळं, रामटेक विधानसभा निवडणुकीचं चित्र अतिशय रंजक होणार आहे.
रामटेक विधानसभेचा इतिहास : १९६२ साली पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक झाली. ज्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. मोहम्मद अब्दुल्ला खान पठाण हे विधानसभेचे पहिले आमदार झाले होते. तर १९६२ ते १९८० पर्यंत येथे काँग्रेसचेच उमेदवार विजयी झाले होते. १९८५च्या निवडणुकीत पहिल्यांदा जनता पक्षाचा उमेदवार येथून विजय झाला होता. त्यानंतर १९९० मध्ये जनता दलानं येथून निवडणूक जिंकली होती. तर १९९१ मध्ये पुन्हा काँग्रेसनं रामटेकची जागा जिंकली होती. मात्र, हा विजय त्यांचा अखेरचा विजय ठरला. १९९५ ते २०१४ पर्यंत येथे शिवसेनेचे उमेदवार विजयी होत आले. २०१४ मध्ये शिवसेना आणि भाजपाची युती तुटल्यानंतर भाजपानं पहिल्यांदाच रामटेकची निवडणूक जिंकली होती. मात्र २०१९ मध्ये ही जागा राखण्यात पक्षाला यश आलं नाही. २०१९ साली अपक्ष उमेदवार आशिष जयस्वाल यांनी रामटेक येथून विजय मिळवला होता.
२०१९ च्या निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मतं :२०१९च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेना एकत्रितपणे लढले तरी देखील अपक्ष उमेदवार आशीष जयस्वाल यांनी येथून दणदणीत विजय मिळवला होता. आशीष जयस्वाल यांना ६७ हजार ४१९ मतं मिळाली तर भाजपा पक्षाचे उमेदवार मल्लिकार्जुन रेड्डी यांना ४३ हजार ०६ मतांवर समाधान मानावं लागलं होतं. काँग्रेस उमेदवार उदयसिंह यादव हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले त्यांना ३२ हजार ४९७ मतं मिळाली होती.
लोकसभा निवडणुकीत मिळालेली मते -
पक्ष : २०२४ २०१९ २०१४
शिवसेना : ५,३५,२५७ ५,९७,१२६ ५,१९,८९२
काँग्रेस : ६,१३,०२५ ४,७०,३४३ ३,४४,१०१
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत प्राप्त मते -
आशीष जयस्वाल (अपक्ष) : ६७,४१९
मल्लिकार्जुन रेड्डी (भाजपा) : ४३,००६
उदयसिंह यादव (काँग्रेस) : ३२,४९७