मुंबई Ajit Pawar :लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला अपेक्षित असं यश मिळालं नाही. त्यानंतर संघाचे मुखपत्र असलेल्या "द ऑर्गनायझर" मधून भाजपाचे कान टोचले होते. तसंच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेल्यानं नाराजी व्यक्त केली होती. त्यातच आता संघ विचाराचं साप्ताहिक असलेल्या विवेकमधून (Vivek Weekly Article) अजित पवारांवर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचं म्हणत, नाराजी व्यक्त केली आहे.
प्रतिक्रिया देताना प्रवक्ते उमेश पाटील (ETV BHARAT Reporter) आघाडी महायुतीला वरचढ ठरली : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करून मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून अजित पवार देखील शिवसेना भाजपासोबत जात सत्तेत सहभागी झाले. दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुका पार पडल्या. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी महायुतीला वरचढ ठरली. संघाचे मुखपत्र असलेल्या "द ऑर्गनायझर" मधून भाजपाचे कान टोचत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेतल्याच्या भूमिकेबाबत असंतोष व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
फोडाफोडीचं राजकारण रुचलं नाही : आता संघाची विचारधार असलेल्या साप्ताहिक विवेकमधून भाजपाने केलेल्या फोडाफोडीचं राजकारण रुचलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेणं भाजपा कार्यकर्त्यांना आवडलेलं नसल्याचा दावा, विवेकमधून करण्यात आला आहे. हिंदुत्वाचा मुद्दा एक असल्यामुळं शिवसेने सोबतची युती मतदारांना पटली होती. मात्र यांच्या उलट राष्ट्रवादी काँग्रेस सोबतची युती त्यामुळं लोकसभा निवडणुकीत आणखीनच नाराजीची भर पडली.
महायुतीचा धर्म आम्ही पाळणार :विवेकमधील लेखाबद्दल अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रवक्ते अमोल मिटकरी म्हणाले की, विवेकमध्ये छापून आलेले जे आर्टिकल आहे ते 'द ऑर्गनायझर' मधील लेखासारखे साम्य दाखवणारे जरी असले तरी, त्यांनी स्वपक्षीय भारतीय जनता पार्टीच्या लोकसभेतील पराभवाचे चिंतन करून बारकावे शोधले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांचा नैसर्गिक मित्र पक्ष नाही. भाजपा आणि शिवसेना हे नैसर्गिक मित्र पक्ष आहेत. त्यामुळं ओघावते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी दोन तीन शब्द आलेले असले तरी ते त्या संपादकांचे वैयक्तिक मत आहे. महायुतीचा धर्म आम्ही पाळणार आहोत. पक्षाचा आदेश असल्यामुळं महायुतीबाबत बोलायचं नाही, त्यामुळं आम्ही बोलणार नाही. मात्र लेखात संपादकांनी वैयक्तिक मत मांडलं याचा अर्थ त्यांच्या पक्षाचे ते अधिकृत मत असेल असं नाही.
सत्तेसाठी स्वार्थाचे राजकारण: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, ज्याप्रकारे द ऑर्गनायझर आणि आता विवेकमधून अजित पवार यांच्या पक्षाला कशाप्रकारे टार्गेट केलं गेलं हे जनतेच्या लक्षात आलं आहे. एका बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षात घेऊन निवडणुकीला सामोरे जायचे हे जनतेच्या लक्षात आले. अपेक्षित असे यश भाजपाला मिळाले नाही. त्यामुळं महायुतीतील भाजपाच्या कार्यकर्त्यात असलेले नाराजीबाबत खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. भाजपा सत्तेसाठी स्वार्थाचं राजकारण करत असल्याचा आरोप ही तपासे यांनी केला आहे.
हेही वाचा -
- बहिणींपाठोपाठ आता 'भाऊ'ही होणार लाडके, नव्या योजनेनं तिजोरीवर किती पडणार ताण? - Ladka Bhau Scheme
- देवेंद्र फडणवीस -अजित पवारांचं हेलिकॉप्टर भरकटलं : अजित पवारांनी सांगितला थरारक अनुभव - Devendra Fadnavis
- विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या घोषणा 'जोमात', योजना मात्र 'कोमात' - Government Scheme