महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुलं, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

Vijay Wadettiwar On State Government : मुख्यमंत्र्यांचा होम ग्राउंड असलेल्या ठाणे शहरातील गोळीबार प्रकरणानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलंय. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे दररोज पत्रकार परिषद घेत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. आज (6 फेब्रुवारी) पुन्हा पत्रकार परिषद घेत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय.

vijay wadettiwar criticized state government over cm eknath shinde photo with gangster nilesh ghaywal
"गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुलं", विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2024, 5:23 PM IST

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद

मुंबई Vijay Wadettiwar On State Government : भारतीय जनता पार्टीचे आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर राज्यातील गुन्हेगारीवर पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी (5 फेब्रुवारी) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक फोटो एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) पोस्ट केला. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पुणे शहरातील गुंड निलेश घायवळ दिसत आहेत. संजय राऊत यांच्यानंतर आता काँग्रेस आक्रमक झाली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज (6 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेत महायुतीवर जोरदार टीका केली आहे. तसंच यासंदर्भात त्यांना एक्सवर पोस्टही शेअर केली आहे.

विजय वडेट्टीवार आपल्या पोस्टमध्ये काय म्हणालेत :विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये निलेश घायवळसह काही जण मंत्रालयात फिरताना रिल्स बनवत आहेत. यावरून विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणालेत की, "गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहेत. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात एसीची हवा घेत आहेत. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर दिवसभर रांगेत उभा आहे. पेपरफुटी विरोधात तरुण-तरुणी रस्त्यावर आंदोलन, उपोषणात आपले आयुष्यातील महत्वाचे दिवस घालवत आहेत. नागपुरात आदिवासी बांधव आपल्या मागण्यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे आणि इकडे सरकार गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुलं करून देत आहे. हीच का ती 'मोदी की गॅरंटी'?" असा सवालही त्यांनी केला.


गुंडाना थेट प्रवेश :याप्रकरणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, "राज्यात कायदा आणि व्यवस्थेचा विषय संपलेला आहे. मुख्यमंत्र्यांना काल भेटायला गेलेला निलेश घायवळ हा गुंड मंत्रालय परिसरात रील तयार करतो. मात्र, सामान्य जनतेला मंत्रालयाच्या रांगेत ताटकळत उभं राहावं लागतं. सामान्य जनतेला रांग आणि गुंडांना मात्र थेट प्रवेश दिला जातो." तसंच हीच खरी सरकारची कमाई असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.


सरकारची भूक वाढलीय : पुढं ते म्हणाले की, "राज्यातील महायुती सरकारची भूक वाढलीय. सत्तेसाठी पैसा आणि पैशातून सत्ता सरकारचं ब्रिद झालंय. 8 हजार कोटींचा अँम्बुलन्स घोटाळा गाजत असताना आता सरकारचा मोबाईल घोटाळा समोर आलाय. निवडणुका तोंडावर असताना मतांसाठी अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना सरकारच्या वतीनं साड्या वाटप केल्या जाणार आहेत. यातही 100 कोटींपेक्षा जास्त घोटाळा झाला असून सदरच्या दोन्ही घोटाळ्यामधील वाटा मंत्री आणि सरकारला मिळणार आहे."


सरकारी तिजोरी लुटण्याचा इरादा : "सरकारमध्ये दोन अलिबाबा आणि 80 चोर असून त्यांच्यात पैसे खाण्याची स्पर्धा लागली आहे. लोकसभा आचारसंहितेपूर्वी सरकारी तिजोरी लुटण्याचा सरकारचा इरादा आहे. अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यापेक्षा त्यांच्या खात्यात पैसे जमा करावेत. भ्रष्टाचार होण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. परंतु, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांवर सरकारचा विश्वास नाही का?" असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. महिला बाल विकास विभाग 155 कोटी रुपयांचा चुना लावणार असून याची चौकशी करावी अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

हेही वाचा -

  1. मुख्यमंत्र्यांचा पुण्यातील गुंडाबरोबरचा फोटो व्हायरल, 'आता रोज एक फोटो ट्वीट करणार', संजय राऊतांचा हल्लाबोल
  2. 'इजा-बिजा-तिजा' सरकार महाराष्ट्राला उद्ध्वस्त करेल- विजय वडेट्टीवार
  3. सरकारकडून प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचं खच्चीकरण सुरू; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details