नाशिक : दोन दिवसापूर्वी लग्न ठरलेल्या तरुणाचा नायलॉन मांजानं बळी घेतल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात आज संक्रांतीच्या दिवशी नायलॉन मांजानं गळा कापल्यानं एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोनू धोत्रे असं नायलॉन मांजानं गळा कापून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. नाशिकमध्ये मागील दीड महिन्यात तीन जणांचा नायलॉन मांजामुळे मृत्यू झाला आहे, तर 9 ते 10 जण जखमी झाले आहेत.
बहिणीला घेण्यासाठी जात होता भाऊ : सोनू धोत्रे हा देवळाली गावातून दुचाकीनं आपल्या बहिणीला पाथर्डी फाटा इथं घ्यायला जात होता. यावेळी सोनू धोत्रेचा नायलॉन मांजानं गळ्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच या तरुणाचं लग्न ठरलं होतं. शहरात पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा सर्सास वापर होताना दिसत आहे. याआधी दोन जणांचा नायलॉन मांजानं मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे प्रकार घडले आहेत. बंदी असतानाही नॉयलॉन मांजाचा वापर होतो कसा? हा मोठा प्रश्न असून आता तर या मांजानं तरुणाचा बळी घेतला आहे.
पोलिसांची करडी नजर : नाशिक शहरात आज मकर संक्रातीचा सण उत्साहात साजरा केला जातोय. ठिकठिकाणी बिल्डिंगच्या टेरेसवर, मोकळ्या जागेत नागरिक पतंग उडवण्याचा आनंद घेत आहेत. अशात नायलॉन मांजामुळे वाढलेल्या दुर्घटना लक्षात घेता, नायलॉन मांजावर नाशिक पोलिसांची करडी नजर आहे. नायलॉन मांजा विरोधात कारवाईसाठी पोलिसांच्या 31 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील विविध इमारतींच्या टेरेसवर, मैदानावर पोलीस पथक धाडी मारत कारवाई करत आहेत.
सात पालकांना अटक : नाशिक पोलिसांकडून नायलॉन मांजा विरोधात कडक मोहीम राबवली जात आहे. नायलॉन मांजा वापरत असल्याचं आढळून आल्यास थेट सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न या कलमाखाली गुन्हा दाखल केला जात आहे. आतापर्यंत नाशिक पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री आणि वापर करणाऱ्यांविरोधात 50 गुन्हे दाखल केले आहेत. नायलॉन मांजा वापरणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या 7 वडिलांना देखील पोलिसांनी अटक केली. नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या आणि वापरणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे.
महिन्याभरात 2 जणांचा मृत्यू 9 जण गंभीर जखमी : नाशिक शहरातील वडाळा गावात नऊ वर्षाच्या बालकाचा नायलॉन मांजामुळे मृत्यू झाला. त्यानंतर ओझर उड्डाणपुलावर जळगाव जिल्ह्यातील दुचाकीस्वाराचा मांजामुळे गळा चिरून मृत्यू झाला. नाशिक- पुणे रोडवर युवकाची नायलॉन मांजामुळे करंगळी कापली. लेखा नगरला दुचाकीस्वाराचा मांजामुळे गळा चिरल्यानं त्याला 28 टाके पडले. वडाळा येथे दुचाकीस्वाराचा मांजामुळे गळा कापून त्याला 40 टक्के पडले. सिडको येथे एका व्यक्तीच्या हाताचे बोटे कापले गेली. सिन्नर येथे एकाच कुटुंबातील तिघांना नायलॉन मांजामुळे गंभीर जखमा झाल्या. युवकाच्या हनुवटीला 50 टक्के पडले. द्वारका भागात महिला नायलॉन मांजामुळे जखमी झाली. या महिलेचं कान, नाक, डोळ्याजवळ गंभीर जखमा झाल्या.
हेही वाचा :