मुंबई Vidhan Parishad Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणूक आटोपताच आता पुन्हा एकदा निवडणुकीचा शंख फुंकण्यात आलाय. राज्यातील विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. दोन शिक्षण मतदारसंघ आणि दोन पदवीधर मतदारसंघात 26 जून रोजी मतदान होणार आहे. त्यामुळं महाविकास आघाडी आणि महायुतीतून कोणाला उमेदवारी देण्यात येणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. तर दुसरीकडं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आघाडी घेत आपल्या पक्षाच्या शिक्षक आणि पदवीधर संघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
ठाकरे गटाकडून परब, अभ्यंकर यांना उमेदवारी :ठाकरे गटाकडून शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदार संघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. पदवीधर मतदार संघातून माजी मंत्री अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवसेना शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
अनिल परब यांना पुन्हा संधी : गेल्या बारा वर्षांपासून विधानपरिषद मतदारसंघातून अनिल परब प्रतिनिधित्व करताय. पक्षाच्यावतीनं यंदा पुन्हा एकदा त्यांना संधी देण्यात आलीय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून अनिल परब यांच्याकडे पाहिलं जातं. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात परिवहन खातं अनिल परब यांनी सांभाळलंय. महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर आणि शिंदे फडणवीस सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर ठाकरे शिवसेनेतून अनेक दिग्गज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाल्याचं चित्र संपूर्ण राज्यानं पाहिलंय. पेशानं वकील असलेले अनिल परब यांनी ठाकरेंच्या शिवसेनेसाठी न्यायालयीन लढाईत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती.
10 जून ऐवजी 26 जूनला होणार मतदान : राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम अगोदरच जाहीर झाला होता. 10 जून रोजी दोन शिक्षक मतदार संघ आणि दोन पदवीधर मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार होती. मात्र, शिक्षक संघटनांनी विरोध केल्यामुळं हे मतदान 26 जून रोजी होत आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघात तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात सदरची निवडणूक पार पडणार आहे. उमेदवारांना अर्ज भरण्याची अंतिम मुदत सात जून 7 जून असून 12 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येईल. तर 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
हेही वाचा -
- लोकसभा निवडणूक सहावा टप्पा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीत बजावला मतदानाचा हक्क - Lok Sabha Election 2024 Phase 6
- लोकसभेचा अचूक अंदाज सांगा आणि बक्षीस मिळवा; पुण्यातील अनोख्या स्पर्धेची सर्वत्र चर्चा - lok sabha election 2024
- लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ६०.०९ टक्के मतदान, महाराष्ट्रात किती मतदान झाले? - voter turn out in fifth phase