मुंबई-विधानसभा निवडणुकीत राज्यभरात प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा होत असल्यानं राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच अधिकाऱ्यांनी थेट वणी येथे शिवसेनेचे (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची झाडाझडती घेतल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी स्वतः हा व्हिडिओ चित्रित केला. त्यांनी समाज माध्यमांवर व्हिडिओ पोस्ट केला आहे.
स्वतः संपूर्ण घटनेचा व्हिडिओ चित्रित केला-माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोमवारी (११ नोव्हेंबर) वणी विधानसभा मतदारसंघात प्रचार सभा झाली. या प्रचार सभेपूर्वी त्यांचे हेलिकॅप्टर हेलिपॅडवर लँड होताच अधिकारी त्यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची तपासणी करण्यासाठी पुढे सरसावले. यावरून उद्धव ठाकरे हे चांगले संतापले. परंतु त्यांनी संयमपणे परिस्थिती हाताळत अधिकाऱ्यांना बॅगांची तपासणी करू दिली. स्वतः या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ त्यांनी चित्रित करून अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
निवडणूक अधिकाऱ्यानं थेट उद्धव ठाकरेंची तपासली बॅग (Source- ETV Bharat Reporter) तुम्ही शेपूट अजिबात घालायचं नाही-यामध्ये उद्धव ठाकरे म्हणतात," माझी बॅग तपासा. मी तुम्हाला अडवणार नाही. माझा युरीन पॉटही तपासा. परंतु आतापर्यंत तुम्ही मिंध्यांची बॅग तपासली का? देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बॅग तपासली का? मोदी, अमित शाह यांची बॅग तपासली का?" त्यावर अधिकारी, "नाही, साहेब" असे म्हणाले. "त्यांच्याही बॅगा तपासा. मोदींची बॅग तपासताना तुमचा व्हिडिओ आला पाहिजे. तिकडे तुम्ही शेपूट अजिबात घालायचं नाही. हा व्हिडिओ मी रिलीज करत आहे." विशेष म्हणजे बॅगा तपासणाऱ्या टीममध्ये फोटो काढणारे अधिकारी हे परराज्यातील होते.
होऊन जाऊ दे-वणी येथे उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची तपासणी करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यानंतर आदित्य ठाकरे यांनीही एक्स मीडियावर पोस्ट करत करत झालेल्या घटनेबद्दल सरकारवर टीका केली. "जे कायद्याला धरून आहे ते व्हायलाच पाहिजे. परंतु हा कायदा सर्वांना समान हवा. महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीशवरांची आणि राज्याला लुटणाऱ्या मिंदेचीसुद्धा तपासणी व्हायला हवी. दूध का दूध और पानी का पानी होऊन जाऊ दे," असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
नाकाबंदी फक्त विरोधी पक्षासंदर्भातच-या घटनेबाबत शिवसेनेचे नेते (उबाठा), खासदार संजय राऊत यांनीही सरकारला धारेवर धरत इशारा दिला आहे. "नियम हा सर्वांसाठी सारखाच असायला हवा. तर आमची हरकत नाही. अथवा गांभीर्याने विचार करावा लागेल. नाकाबंदी ही फक्त विरोधी पक्षासंदर्भातच आहे का? लोकसभा निवडणुकीवेळी मी एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमधून उतरवलेल्या बॅगांचे चित्रण दाखवले होते. एका सभेला ते दोन तासासाठी आले असता त्यांच्या बारा बॅगा उतरविण्यात आल्या होत्या. त्यांची सुरक्षा व्यवस्था त्या बॅगांचे व्यवस्थित मॅनेजमेंट करत होते. हे सर्व चित्रण तेव्हा ही निवडणूक आयोगाला दाखवले. आताही दाखवत आहोत. परंतु त्यावर कुठलीच कारवाई होत नाही," असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
हेही वाचा-
- चांदिवली मतदारसंघात चुरशीची लढत; दिलीप लांडे विरुद्ध आरिफ नसीम खानच्या लढतीत कोण बाजी मारणार?
- उद्धव ठाकरे, तुम्ही कुठे बसलात याची आठवण करून देतो..अमित शाह यांचा हल्लाबोल
- "काँग्रेसची साथ दहशतवाद्यांना आणि हात..."; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोप