मुंबई-उद्धव ठाकरे हे औरंगजेबाचे फॅन आहेत, अशी भाजपाकडून टीका करण्यात आली होती. या टीकेला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. मराठ्यांनी औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापले होते, याची आठवण ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना करून दिली. ते खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.
खासदार संजय राऊत-देशात युद्धाची परिस्थिती आहे, असे वातावरण निर्माण झाले. ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही निवडणुकीच्या महाभारतात कोणती भूमिका बजाविणार आहे?धनुष्यबाण ते मशाल या स्थित्यतरांचा निवडणुकीवर काय परिणाम होईल?
ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे-महाभारतात द्रौपदीचे वस्त्रहरण झाले, आता लोकशाहीचे वस्त्रहरण होत आहे. स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतीवीरांना हे स्वांत्र्य बलिदानातून दिले. ते टिकविण्याचं काम आपण करायला हवे. लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत. सर्वोच्च न्यायलयाचा निकाल लागला नाही. सर्वोच्च न्यायालयानं राज्यपालांचा निर्णय, लवादाचा निर्णय चुकीचा असल्याचं सांगितलं. पक्ष कोणाचा हे लोकप्रतिनिधी ठरवू शकत नाही, असे न्यायालयानं सांगितलं. तरीही पंतप्रधान हे शिवसेनेला नकली सेना म्हणतात. याचा अर्थ ते चिन्ह आणि नाव आम्हाला देऊ नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्यात येत आहेत.
खासदार संजय राऊत-उद्धव ठाकरेंचा अभिमन्यू झाल्याचं म्हटले जाते?
ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे-अभिमन्यू हा शूर होता. ईडीसारख्या चक्रव्यूह टाकण्यात येतात. पक्षात आणि कुटुंबात कलह निर्माण केला जात आहे. मात्र, ही कौरव नीती हरणार आहे. पाच पांडवांनी कौरवावर मात केली. कारण, ते सत्याच्या बाजूनं होते. हे युद्ध आम्ही जिंकत आहोत.
खासदार संजय राऊत-प्रचाराची दिशा कशी आहे?
ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे-गेल्या दहा वर्षातील मोदी सरकारच्या थापा उघड झाल्या आहेत. त्यांना घोषणांचा विसर पडल्यानं त्यांना, मी गझनी सरकार म्हणतो. त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला असला तरी जनतेच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाल नाही. जनता पेटलेली आहे. शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न, प्रत्येकाला घर या त्यांच्या भूलथापा आहेत. महाराष्ट्रात कधीही गद्दारी सहन करत नाही. खंडोजी खोपडे हे गद्दार असल्याचे तीनशे वर्षापासून म्हटले जाते. तसा गद्दाराचा ठपका पुसणार नाही. या भेकड्यांची काय अवस्था आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटावर केली
खासदार संजय राऊत-जनतेकडं गद्दारांचा मुद्दा पोहोचला का
ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे-जनतेच्या मनात मशाली पेटल्या आहेत. त्यांनी शिवेसनेसह महाराष्ट्राचा विश्वासघात केला. मेडिकल डिव्हाईस, वेदांता-फॉक्सवॅगन, डायमंड पार्कसारखे उद्योग गुजरातला नेले. जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा हे उद्योग पळविले नाहीत. डबल इंजिन सरकारनं डबल इंजिन लावून उद्योग पळविले आहेत. मोदींनी महाराष्ट्राचे दहा वर्षात प्रेम पाहिले. आता त्यांनी संताप पाहावा.
खासदार संजय राऊत आम्हीच शिवसेना असल्याचे सांगतात. त्यावर तुमचे मत काय?
ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे-आम्हीच शिवसेना असल्याचे सांगतात, ते जनतेची लूट पाहत आहेत. जन्म देणाऱ्या शिवसेनेच्या कुशीवर वार केला. त्याचबरोबर महाराष्ट्राशीही गद्दारी केली. हे महाराष्ट्रात चालणार नाही.पंतप्रधान मोदी हे कोणत्यातरी गल्लीबोळात रोड शो घेतात. घाटकोपरमध्ये घेणार आहेत. त्या ठिकाणी मराठी लोकांच्या प्रचाराला विरोध केलं आहे. मराठी लोकांना विरोध करण्यासाठी बळ देण्याकरिता रोड शो घेणार आहेत का? कोरोनाच्या काळात सर्व जात धर्मासाठी काम केले. उत्तर प्रदेशमध्ये गंगा किनारी प्रेते वाहत होते. मी कुठेही भेदभाव गेला नाही. गुजरातबद्दल आकस नाही, ते आमचेच आहेत.