मुंबई Chandrahar Patil Joined Thackeray Group : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी शिवसेना शिंदे गटात रविवारी (10 मार्च) पक्षप्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या धरतीवर एकीकडं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाला गळती लागली असताना आज (सोमवारी) 'महाराष्ट्र केसरी' चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी पक्षातून बाहेर पडलेल्यांवर घणाघाती टीका केली.
पळपुटे, नामर्द पळून जाताहेत : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना गदा आणि भगवा देऊन उद्धव ठाकरेंनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "आज माझी छाती अभिमानानं मोठी झाली आहे. सांगलीत आता आपल्यासमोर लढण्याची कोणाची हिंमत होणार नाही. कारण तिथं आता पैलवान विरोधकांसमोर उभा असणार आहे. पक्षातून पळपुटे, नामर्द पळून जात आहे, आणि मर्द येत आहेत. अबकी बार चंद्रहार! फक्त या घोषणा देऊन चालणार नाही. पुढील जबाबदारी देखील तुम्हाला घ्यावी लागेल. गदा आणि मशाल हे मर्दाच्या हातातच शोभतात. तसंच जे गद्दार आहेत, त्यांना आता आडावं पाडायचंय", असं आवाहनही त्यांनी यावेळी शिवसैनिकांना केलं.
चंद्रहार पाटील यांची प्रतिक्रिया : ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया देत चंद्रहार पाटील म्हणाले की, "एका शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही सर्वांनी मान दिला, त्याबद्दल मी आभारी आहे. मला बोलून दाखवण्यापेक्षा काम करुन दाखवायचंय. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याचा निकाल पहिला असेल. मला लोकसभा निवडणुकीसाठी संधी देण्याबद्दल उद्धव ठाकरेंसह सर्वांचं मनापासून धन्यवाद."
मी विजयी सभेलाच येणार :पुढं ते म्हणाले की, "आज संपूर्ण जनता एका अपेक्षेनं आपल्याकडं बघत आहे. आजच्या प्रवेशानं जनतेचा विश्वास अधिक दृढ झालाय. चंद्रहार यांचा प्रचार आता तुम्हाला करायचाय. आता मी थेट विजयी सभेलाच येणार. शेतकऱ्यांच्या अपेक्षेचं वजन गदेपेक्षा अधिक आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर यावेळी बोलत असताना संजय राऊत म्हणाले की, "चंद्राहारच्या प्रचाराला मी सुद्धा येणार आहे. कुस्तीचं मैदान गाजवल्यानंतर आता चंद्रहार राजकीय मैदान गाजवणार आहे."
हेही वाचा -
- 'एक खडा तिकडे गेला तरी शिवसेनेची ताकद कमी होत नाही', रवींद्र वायकरांच्या शिंदे गटातील प्रवेशावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
- 'भाजपावाल्यांना लग्नात बोलावू नका, येतील, जेवतील अन् नवरा बायकोचं भांडण लावतील'; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- उत्तर-पश्चिम मतदारसंघातून उमेदवार जाहीर करणं हे युती धर्माचे उल्लंघन नाही का? संजय निरुपम यांची उद्धव ठाकरेंवर टीका