मुंबई Uddhav Thackeray Attack On BJP :पैठण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता गोर्डे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आज (6 फेब्रुवारी) ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळं हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जातंय. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गटाचे) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. या प्रवेशानंतर बोलत असताना उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला. तसंच "भाजपाची हुकूमशाही आता उलथून लावायची", असंही ते म्हणाले.
काय म्हणाले उध्दव ठाकरे? :यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "मागील चार-पाच दिवसांपासून मी कोकण दौऱ्यावर होतो. या दौऱ्यात मी कुटुंबसंवाद ही यात्रा केली. मला पाहायचं होतं की, माझ्यासोबत माझे कुटुंब आहे की नाही? कोरोनाकाळात 'मी आणि माझे कुटुंब' ही मोहीम आम्ही राबवली होती. आता महाराष्ट्र आणि देशावर संकट आले असताना हे कुटुंब माझ्यासोबत आहे की नाही? हे मला बघायचं होतं म्हणून मी हा दौरा केला," असं उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात मागील काही महिन्यांपूर्वी दोन चक्रीवादळं आली होते. पण आता महाराष्ट्रातून भगवे वादळ दिल्लीच्या तख्तावर धडकणार आहे आणि हुकूमशाहीची चिरफाड करणार आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली.
हुकूमशाहीला आता गाडून टाकायचे : पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "आज दत्ता गोर्डे आणि त्यांचे सहकारी शिवसेना (ठाकरे गट) या पक्षात आलेले आहेत. मी त्यांचे स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो. सध्या देशात बोललं जातंय की, इंडिया आघाडी आहे. महाविकास आघाडी आहे. पण पर्याय कुठे आहे. जी देशात हुकूमशाही माजलीय. त्या हुकूमशाहीला
आपल्याला गाडून टाकायचंय. तसंच आपल्या पक्षात विविध जाती-धर्मातील लोक प्रवेश करत आहेत. भाजपाचेही लोक आपल्याकडे येतायत त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे."