पुणे : सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूवरुन आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्यास सुरुवात केली. आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी मागासर्वगीय असल्यानंच पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी याची हत्या केली, असा आरोप केला. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
परभणीत जाऊन विद्वेषाचं काम केलं : परभणीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी हे केवळ राजकीय हेतूने परभणीत आले होते. ही त्यांची राजकीय भेट होती. गेली अनेक वर्षे ते लोकांमध्ये जाती जातीत भेद निर्माण करायचं काम करत आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की त्यांनी परभणीत जाऊन विद्वेषाचं काम केलं. आमचं सरकार संवेदनशील असल्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयीन चौकशीत संपूर्ण सत्य बाहेर येणार आहे. तसंच कुठल्याही आरोपीला सोडण्यात येणार नसल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली.
प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ETV Bharat) शरद पवार म्हणाले दोन्ही ठिकाणी तुम्ही लक्ष द्या : यावेळी फडणवीस यांनी सांगितलं की, शरद पवार हे देखील परभणी येथे गेले होते. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पवार साहेबांनी मला एवढच सांगितलं की, या दोन्ही ठिकाणी तुम्ही लक्ष घाला आणि मी त्यांना सांगितलं की मी दोन्ही ठिकाणी लक्ष घातलं आहे.
लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार ? :नवीन सरकार स्थापन होऊन आज जवळपास १८ दिवस झाले आहेत. तरीही अद्याप लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता महिलांना मिळालेला नाही. त्यामुळं लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? याबाबत आता राज्यभरातून प्रश्न विचारले जात आहेत. या पार्श्वभूमीवरच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुढच्या सात ते आठ दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर होते. कृषी तंत्रज्ञान अनुपयोग संशोधन संस्था येथे 'किसान एवं ग्रामीण विकास लाभार्थी संमेलनाच' उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं.
तिन्ही पक्षातील नेत्यांच्या मनात भुजबळ यांच्याबाबत सन्मान :आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याबाबात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छगन भुजबळ मला हे भेटले आणि जी काही आमच्यात चर्चा झाली त्याबाबत स्वतः भुजबळ यांनी सांगितलं आहे. भुजबळ हे महायुतीचे प्रमुख नेते आहेत. आमच्या तिन्ही पक्षातील नेत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल सन्मान आहे. तसंच महायुतीच्या विजयात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. स्वतः अजित पवार हे देखील त्यांची काळजी करतात. अजित पवार यांचा कोणत्याही प्रकारे भुजबळ यांना डावलण्याचा प्रयत्न नव्हता. भुजबळ यांना राष्ट्रीय पातळीवर त्यांना पाठवायचं होतं. पण आता हा प्रश्न निर्माण झाला असल्यानं आम्ही त्याच्यावर तोडगा काढू असं फडणवीस म्हणाले.
हेही वाचा -
- मागासवर्गीय असल्यानं सोमनाथ सूर्यवंशीची पोलिसांनीच केली हत्या - राहुल गांधींचा आरोप
- "आठ ते दहा दिवसात आपण पुन्हा भेटू आणि...", देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांच्या भेटीत मोठी खलबतं ?
- सहा दिवसांचं अधिवेशन घेऊन सरकारनं 'नागपूर करारा'ची थट्टा केली का? विरोधकांच्या मवाळ भूमिकेचा सत्ताधार्यांना फायदा