अमरावती : "निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 'बटेंगे तो कटेंगे' असं म्हणून विरोधक समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत. खरंतर फार पूर्वी मनुस्मृतीच्या माध्यमातून या लोकांनीच विविध वर्ण आणि जातीव्यवस्थेत आम्हाला विभक्त करून कापण्याचं काम केलं. विभक्त करणं आणि कापणं हीच त्यांची परंपरा आहे", अशी घणाघाती टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. तिवसा मतदार संघात गुरुकुंज मोझरी येथे यशोमती ठाकूर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत असताना खरगे यांनी भाजपावर निशाणा साधला.
मुख्यमंत्री योगींवर टीका : यावेळी बोलत असताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, "गुरुकुंज मोझरी ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भूमी आहे. तुकडोजी महाराज असो किंवा फार पूर्वी झालेले संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशा अनेक संतांनी समाज सुधारण्याची शिकवण दिली. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नाथ संप्रदायाचे आहेत. संत महात्म्यांसारखा पोशाख परिधान करतात. पण संतांचा पोशाख धारण करून ते राजकारण करतात." तसंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी संपूर्ण देशाला एकत्रीकरणाचा संदेश दिला असताना तुकडोजी महाराजांच्या भूमीत 'बटेंगे तो कटेंगे' अशी भाषा योगी आदित्यनाथ यांना अशोभनीय असल्याचंदेखील खरगे म्हणाले.