पुणे Lok Sabha Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगानं आता उमेदवारी अर्ज भरताना नियम कडक केले असून निवडणुकीसाठी आता अर्ज भरताना उमेदवाराची काही वैयक्तिक माहिती देखील विचारण्यात येते. यामध्ये उमेदवाराची एकूण संपत्ती, उत्पन्न आणि कर्ज किती, याबाबतची माहिती विचारली जाते. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज (18 एप्रिल) आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्जाबरोबर त्यांनी संपत्तीबाबत प्रतिज्ञापत्रही सादर केले. दरम्यान, या प्रतिज्ञापत्रातून मोठा खुलासा झाला आहे.
सुप्रिया सुळे यांच्या प्रतिज्ञापत्रात काय म्हटलंय? : उमेदवारी अर्जाबरोबर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर असलेलं कर्ज आणि उपन्नाची माहिती दिली आहे. सुप्रिया सुळे यांच्यावर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांचे 55 लाखांचे कर्ज असल्याची माहिती शपथपत्रातून समोर आली आहे. तसंच सुप्रिया सुळे यांच्याकडं रोख रक्कम 42 हजार 500 आहे. तर त्यांची एकूण प्रॉपर्टी ही 38 कोटी 6 लाख 48 हजार 431 रूपयांची आहे. त्यांचे पती सदानंद सुळे यांच्याकडे 114 कोटी 63 लाख 80 हजार 575 रू एवढी प्रॉपर्टी आहे. तसंच सुप्रिया सुळे यांच्याकडं 1927.660 ग्रॅम म्हणजेच 1 कोटी 1 लाख 16 हजार 118 रुपयांचं सोनं, 6742.100 ग्राम म्हणजेच 4 लाख 53 हजार 446 रू. किंमतीची चांदी आणि 1 कोटी 56 लाख 6 हजार 321 रुपयांचे हिरे आहे.
सुनेत्रा पवार यांच्या प्रतिज्ञापत्रात काय म्हटलंय? : सुनेत्रा पवार यांनी प्रतिज्ञापत्रात आपलं वार्षिक उत्पन्न चार कोटी 22 लाख 21 हजार रुपये इतकं दाखवलंय. गेल्या वर्षीच्या उत्पन्नाच्या तुलनेत यावर्षी त्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे. त्यांचे पती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वार्षिक उत्पन्न 80 लाख 76 हजार दोनशे रुपये इतकं दाखवण्यात आलंय. सुनेत्रा पवार यांच्याकडे रोख रक्कम तीन लाख 96 हजार 450 रुपये आहे. अजित पवार यांच्याकडील रोख रक्कम दोन कोटी सत्तावीस लाख 64 हजार 457 रुपये दाखवण्यात आली आहे. तसंच सुनेत्रा पवार यांच्याकडं 34 लाख 39 हजार 569 रुपयांचे सोने आणि चांदी आहे.
सुनेत्रा पवारांकडं 58 कोटी 39 लाख 40 हजार 751 रुपयांची एकूण स्थावर मालमत्ता आहे. त्यामध्ये शेतजमीन आणि इतर प्रकारच्या जमीनीचा समावेश होतो. तर अजित पवारांच्या नावे 37 कोटी 15 लाख 70 हजार 029 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावे 12 कोटी 56 लाख 58 हजार 983 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्यावर 12 कोटी 11 लाख 12 हजार 374 रुपयांचं कर्ज आहे. तर अजित पवारांवर 4 कोटी 74 लाख 31 हजार 239 रुपयांचं कर्ज आहे.
हेही वाचा -
- "10 वर्षांत केंद्र सरकारनं दिलेली आश्वासनं...", शरद पवारांचा हल्लाबोल - Lok Sabha Election 2024
- सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांनी भरला उमेदवारी अर्ज; महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचं शक्तीप्रदर्शन - Lok Sabha Election 2024
- 'गांभिर्यपूर्वक' राजकारण करणारे अजित पवार पत्नीसह दगडूशेठ हलवाईच्या दर्शनाला; सुनेत्रा पवार भरणार उमेदवारी अर्ज - Sunetra Pawar