पुणे : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार हे वेगळे झाले. असं असलं तरी आजही अनेक कार्यकर्त्यांना दोन्ही पवारांनी एकत्र यावं, असं वाटत असतं. त्यातच काल (12 डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार सहकुटुंब त्यांच्या भेटीला गेले. या भेटीनंतर दोन्ही पवार एकत्र यावे, अशी जोरदार चर्चा सुरू झाली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार)आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी मोठं विधान केलं आहे. "दोन्ही पवारांनी एकत्र यावं. संपूर्ण राज्यातील कार्यकर्त्यांना वाटतं की, विखुरलेलं कुटुंब एकत्र यावं, तेच मला देखील वाटतं," असं सुनंदा पवार म्हणाल्या.
अजित पवार आणि शरद पवार निर्णय घेतील : यावर्षीची भीमथडी जत्रा येत्या 20 ते 25 डिसेंम्बर रोजी होणार असून याबाबत माहिती देण्यासाठी सुनंदा पवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. "काल शरद पवार यांचा 85 वा वाढदिवस होता. हा एक कौटुंबिक प्रसंग होता आणि सगळे शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या भेटीला गेले होते. त्यामुळं या भेटीचा कुठलाही राजकीय अर्थ लावू नये. राजकारणात कार्यकर्ता हा मोठा असतो आणि त्याच्या भावना जाणून घेणं देखील राज्यकर्त्यांची जबाबदारी असते. मूठ घट्ट असेल, तर त्याची ताकद राहते. आपण विखुरलेले राहू तर ती ताकद कमी होते. मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते, पण याबाबतचा निर्णय अजित पवार आणि शरद पवार घेतील," असं सुनंदा पवार म्हणाल्या.
प्रसारमाध्यमांशी बोलताना सुनंदा पवार (Source - ETV Bharat Reporter) निकालावर माझा विश्वास नाही : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत सुनंदा पवार यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, "राज्यात आलेल्या विधानसभा निकालावर माझा विश्वास नाही. राज्यात एवढी नाराजी असतानाही अशा प्रकारे निकाल लागला, हा निकाल पटत नाही."
प्रसारमाध्यमांशी बोलताना अंकुश काकडे (Source - ETV Bharat Reporter) अंतिम निर्णय शरद पवार घेतील : दोन्ही पवारांनी एकत्र यावं याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते अंकुश काकडे यांना विचारलं असता ते म्हणाले, "अजित पवारांनी शरद पवारांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ही चांगली बाब आहे. या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील, अशा चर्चा सुरू झाल्या. भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. कार्यकर्ते आणि काही प्रमुखांची इच्छा आहे की, या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन काम करावं, तसं झाल्यास आनंदाची गोष्ट असेल. पण याचा अंतिम निर्णय शरद पवार घेतील. त्यांनी निर्णय घेतला, तर सगळेच एकत्र येतील आणि यात काही अडचण राहणार नाही. शरद पवारांनी जर निर्णय घेतला, तर त्याला कोणताही कार्यकर्ता, पदाधिकारी विरोध करेल असं वाटत नाही."
चक्की पीसिंग म्हणणारे मांडीला मांडी लावून बसले : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानावर काकडे यांना विचारलं असता ते म्हणाले, "अमोल मिटकरी, रूपाली पाटील यांची पक्षात स्वतःची किंमत काय आहे? अमोल मिटकरीला अकोल्यात कोण ओळखतं? शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले, तर अमोल मिटकरी आणि रुपाली पाटील यांची कुचंबना होणार आहे. चक्की पीसिंग म्हणणारे आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. एकमेकांवर केलेल्या टीकेला आज महत्त्व राहिलं नाही. काल केलेली टीका उद्या स्तुतिसुमने होऊ शकतात," असं सूचक विधान करत त्यांनी अजित पवारांना टोला लगावला.
हेही वाचा
- भाजपाचं हिंदुत्व केवळ मतांसाठी; बांगलादेशात हिंदू मारले जात असताना मोदी शांत कसे? उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल
- संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024 : विरोधी पक्षातील नेत्यांनी संविधान खिशातच ठेवलं, तर भाजपानं . . . . राजनाथ सिंहांचा हल्लाबोल
- 'शरद पवारांचे 5 खासदार फोडा, तेव्हाच मिळणार केंद्रात मंत्रिपद'; भाजपाने अजित पवारांना ऑफर दिल्याचा संजय राऊतांचा दावा