मुंबई : विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सत्ताधार आणि विरोधक यांच्यातील कलगीतुरा अधिकच वाढत असल्याचं बघायला मिळतंय. अशातच आता निवडणुकीचा प्रचार करत असताना शिवसेनेचे (उबाठा) खासदार अरविंद सावंत यांनी महायुतीच्या उमेदवार शायना एनसी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. "त्या आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि आता शिवसेनेत आल्या. पण इथं इम्पोर्टेड माल चालत नाही. आमच्या इथं ओरिजनल माल चालतो,” असं ते म्हणाले. अरविंद सावंत यांच्या या वक्तव्यानंतर शायना एनसी चांगल्याच संतापल्या आहेत. याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर अरविंद सावंत यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
तत्काळ कारवाई व्हावी : अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर आता राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. "अरविंद सावंत यांनी ज्या पद्धतीनं मुंबादेवीच्या उमेदवार शायना एन सी यांचा 'माल' असा उल्लेख करत अपमान केलाय. तो अत्यंत निषेधार्थ आहे. मी त्याचा निषेध करतो. उद्धव ठाकरे यांनी अरविंद सावंत यांच्यावर तत्काळ कारवाई केली पाहिजे. कारण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महिलांचा आदर करण्याचं शिकवलंय. त्याच्या विपरीत अरविंद सावंत यांनी केलंय. त्यामुळं त्यांनी शायना एनसी यांची माफी मागावी", अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी दिलीय.