अमरावती : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत आहेत. त्यातच बडनेरा विधानसभा मतदारसंघात आमदार रवी राणा यांचा पराभव करण्यासाठी माजी आमदार दिवंगत संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड या सक्षम उमेदवार मानल्या जात होत्या. मात्र, असं असतानाच बुधवारी (23 ऑक्टोबर) शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बडनेराच्या जागेसाठी पक्षाचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांचं नाव जाहीर केलं. त्यामुळं प्रीती बंड नाराज झाल्या आहेत. त्यानंतर आता बंड यांनी ही निवडणूक अपक्ष लढणार असल्याचं जाहीर केलंय. तसंच हा निर्णय सर्व कार्यकर्त्यांच्या सहमतीनं घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
पक्ष आदेशानं लागल्या होत्या कामाला : 2019 मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमरावतीत एका जाहीर सभेत प्रीती बंड यांना बडनेरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती. आमदार रवी राणा यांच्या विरुद्ध प्रीती बंड यांनी गत निवडणुकीत 74 हजार 919 मतं घेतली. तेव्हा त्यांचा 15 हजार 541 मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर 2024 च्या निवडणुकीसाठी पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यानुसार त्या कामाला लागल्या होत्या. मात्र, ऐनवेळी तिकीट कापल्याची खंत प्रीती बंड यांनी व्यक्त केली.