मुंबई Mumbai Lok Sabha : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील नाम जोशी मार्ग येथील म्हसकर उद्यान येथे असलेल्या मतदान केंद्रात मनोहर नलगे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पोलिंग एजंट म्हणून काम पाहात होते. ह्रदयविकारानं दुपारी त्यांचा मृत्यू झाला. मतदान केंद्रात पुरेशी सुविधा नसल्यानं हा मृत्यू झाल्याचा आरोप दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अरविंद सावंत यांनी केलाय. त्यामुळं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
उष्माघात आणि हृदयविकारानं मृत्यू : मनोहर नलगे हे सकाळपासून म्हसकर उद्यान येथील मतदान केंद्रावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीनं पोलिंग एजंट म्हणून काम पाहात होते. दुपारी त्यांना उष्माघाताचा थोडा त्रास झाला. त्यानंतर त्यांना अचानक शौचास जावं लागलं. ते शेजारच्या पोलिंग एजंटला सांगून शौचाला गेले. त्यानंतर बराच वेळ ते परत आलेच नाहीत. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर पोलिंग एजंटची सही घेतली जाते. त्यावेळी नलगे यांचा शोध घेण्यात आला ते शौचालयातच मरण पावल्याचं लक्षात आलं. शौचालयाचा दरवाजा तोडून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह केईएम रुग्णालयात पाठवण्यात आलाय.