महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षात 'शिंदेशाही', शिवसेना ठाकरे पक्षानं कशामुळे केले गंभीर आरोप? - Uddhav Thackeray Vs Eknath Shinde - UDDHAV THACKERAY VS EKNATH SHINDE

Eknath Shinde : उद्धव ठाकरे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र आता पुन्हा शिवसेनेत एकनाथ शिंदे यांची शिंदेशाही सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (File photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 22, 2024, 1:22 PM IST

Updated : Jul 22, 2024, 1:55 PM IST

मुंबई Eknath shinde :आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत 'वर्षा' बंगल्यावर शिवसेनेच्या सर्व आमदारांची आणि खासदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत महायुतीतील सर्वात यशस्वी पक्ष ठरल्यानं विधानसभेला जास्तीत जास्त जागा लढवाव्यात, अशी मागणी या बैठकीतून शिवसेनेच्या नेत्यांनी केली.

एकनाथ शिंदे यांनी काय सूचना दिल्या :एकनाथ शिंदे यांनी आमदार खासदारांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्देश दिलेत. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक बांधणीला प्राधान्य द्यावं, विधानसभानिहाय मतदार संघाचा सर्व्हे करावा, युवासेना आणि महिला आघाडीमध्ये नवीन सदस्यांची प्राधान्यानं नोंदणी करावी तसंच सरकारी योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावी, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना दिले. या सर्वबाबतीत वारंवार आढावा घेऊन आखलेल्या रणनीतीची अंमलबजावणी होत आहे की नाही हे तपासावं, असेही निर्देश दिले आहेत. रणनीतीचा अहवाल तयार करावा यासाठी विधानसभा निवडणूक निरीक्षक आणि प्रभारींची नियुक्ती एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

प्रभारी आणि निरीक्षकांची नियुक्ती : राज्यातील महत्त्वाच्या विधानसभानिहाय मतदार संघांवर पक्षाकडून 126 निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात आले. तर प्रत्येक जिल्ह्यात तीन प्रभारी नियुक्त करण्यात आले. निरीक्षक आणि प्रभारी यांना निवडणुकीच्या घडामोडींबाबत तसंच प्रचार आणि प्रतिसादाबाबत सातत्यानं लक्ष ठेवून त्या संदर्भातील अहवाल तयार करण्यास सांगितलं. तसंच हा अहवाल केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनाच सादर करावा, अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय भोर यांनी दिली.

एकनाथ शिंदे यांचे हे वागणे म्हणजे... : या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते तुषार रसाळ म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे वागणं म्हणजे आपण हसे लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला असं आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घराणेशाहीचे अनाठायी आरोप केले. त्यांची आता शिंदेशाही सुरू आहे. वर्षानुवर्ष प्रामाणिकपणे काम करणाऱ्या गोपाळ लांडगे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न देता पुन्हा आपल्याच पुत्राला उमेदवारी देऊन खासदार बनवलं. त्या पाठोपाठ आता त्यांनी नेमलेल्या पक्ष निरीक्षक आणि प्रभारी यांचा अहवाल एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे आणि आपल्या पुत्राकडेच देण्यास सांगितलंय. त्यांच्या पक्षात असलेल्या जुन्या जाणत्या आणि अनुभवी नेत्यांची ही गळचेपी नाही का? वरिष्ठ नेत्यांना डावलून स्वतःच्या मुलाकडे अधिकार देणं म्हणजे घराणेशाही नाही का?" असा सवाल रसाळ यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा

  1. अमित शाहांची शरद पवारांवर टीका, सुप्रिया सुळेंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “हे ऐकून मला हसू…” - Supriya Sule
  2. "मराठा आरक्षणाविषयी मनोज जरांगे पाटलांच्या मनात..."; मंत्री दीपक केसरकरांचं आवाहन - Deepak Kesarkar on Manoj Jarange
  3. अजित पवारांची मोठी घोषणा; विधानसभा महायुतीबरोबर तर स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवणार - Ajit Pawar Vidhan Sabha Election
  4. "शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही? वाजपेयी, मोदींमुळं आरक्षण..."- देवेंद्र फडणवीस - Devendra Fadnavis
Last Updated : Jul 22, 2024, 1:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details