महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

महायुतीत भाजपाकडून शिवसेनेची कोंडी? आमदार मनीषा कायंदेंनी स्पष्टच सांगत विषय संपवला - MANISHA KAYANDE EXCLUSIVE INTERVIEW - MANISHA KAYANDE EXCLUSIVE INTERVIEW

Manisha Kayande : महायुतीत भाजपाकडून शिवसेनेची कोंडी होत असल्याची चर्चा सुरु होत्या. यावर शिवसेना (शिंदे गट) नेत्या मनिषा कायंदेंनी स्पष्टचं भाष्य केलंय.

Manisha Kayande
'महायुतीत भाजपाकडून शिवसेनेची कोंडी?' आमदार मनीषा कायंदेंनी एका वाक्यात स्पष्ट सांगत विषय संपवला

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 28, 2024, 1:30 PM IST

मनीषा कायंदे

मुंबई Manisha Kayande : 'उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली' असे आरोप करत एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार आणि 12 खासदारांसह सुरतमार्गे गुवाहाटी गाठली. त्याचवेळी 'महाशक्ती आपल्या पाठीशी आहे' हे एकनाथ शिंदे यांचं विधान चर्चेत आलं. त्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदारांसह मुंबईत आले आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, आता याच महाशक्तीकडून शिंदे गटातील विद्यमान खासदारांची उमेदवारीच धोक्यात असल्याचं चित्र आहे. त्यामुळं भाजपामध्ये आपली कोंडी होत असल्याची भूमिका अनेक कार्यकर्त्यांनी माध्यमांसमोर बोलून दाखवली. भाजपामध्ये कोंडी होत, असताना भाजपाच्या 400 पार घोषणेत शिंदेंच्या शिवसेना वाटा किती असेल? यासह अन्य मुद्द्यांवर शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधलाय.

लोकांचा मोदींवर विश्वास : सध्या भाजपा आणि मित्रपक्षांचे राष्ट्रीय स्तरावरचे सर्वच नेते महाराष्ट्रात अनेक प्रचार सभा घेत असून, मनीषा कायंदे भाजपच्या नेत्यांसह प्रचाराच्या मैदानात आहेत. राज्यात लोकांचा प्रतिसाद काय आहे याबाबत बोलताना मनीषा कायंदे म्हणाल्या की, "लोकांचा मोदींवर विश्वास आहे. त्यांनी मागील दहा वर्षात जे काम केलं, तोच विकास पुढं देखील लोकांना अपेक्षित आहे. त्यामुळंच संपूर्ण राज्यभरात लोक मोदींच्या सभांना गर्दी करत आहेत. लोकांना विकास हवाय. मोदींसमोर 'इंडिया' आघाडीकडं पंतप्रधान पदासाठी चेहरा देखील नाही. त्यामुळं लोक यावेळी देखील आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करतील."

उद्धव ठाकरेंच्या जाहीरनाम्यावर टीका : दहा वर्षाच्या काळात शेतकऱ्यांसाठी भाजपानं अनेक कामं केल्याचं मनीषा कायंदेंनी सांगितलं. त्याच अनुषंगानं ठाकरे गटानं जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणाबाबत विचारलं असता मनीषा कायंदे म्हणाल्या की, "2019 च्या निवडणुकांवेळी देखील उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रचार केला होता. या प्रचार दौऱ्यांना मी स्वतः त्यांच्या सोबत होते. या प्रचार दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी आम्ही तुम्हाला मदत करु, कर्जातून मुक्ती देऊ अशी आश्वासनं शेतकऱ्यांना दिली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले. मात्र या आश्वासनाचं पुढं काय झालं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यांनी जे सांगितलं होतं ते करु शकले नाहीत." तसंच ठाकरेंच्या जाहीरनाम्यात सावरकरांना स्थान नाही. सावरकर हा ठाकरेंच्या जिव्हाळ्याचा विषय. ती शिवसेनेची अस्मिता आहे. मात्र, सावरकरांच्या भारतरत्न बाबत कोणताही उल्लेख ठाकरेंच्या जाहीरनाम्यात दिसत नाही, अशी टीका मनीषा कायंदे यांनी केली आहे.

महायुतीत कोणताही वाद-विवाद नाही : नाशिक, पालघर, ठाणे, कल्याण यांसह अन्य काही लोकसभा मतदारसंघात आम्ही शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही अशी जाहीर भूमिका भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतलेली दिसते. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या विद्यमान खासदारांच्या जागांवर दावा कायम ठेवलाय. त्यामुळं शिवसेना शिंदे गट ही कोंडी कशी सोडवणार? लोकसभेला शिंदेंच्या शिवसेनेची ही अवस्था असेल तर विधानसभा निवडणुकीला 40 पैकी किती जागा शिंदे यांच्या वाट्याला येतील? हा मुद्दा आता चर्चेत आलाय. यावर बोलताना आमदार कायंदे म्हणाल्या की, "महायुतीत असा कोणताही वादविवाद नाही किंवा भाजपकडून आमच्यावर कोणताही दबाव नाही. कार्यकर्त्यांना वाटत असतं आपल्या पक्षाचा उमेदवार असावा. मात्र, युती किंवा आघाडीत लढत असताना सर्वच कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे होईल हे शक्य नसतं. लोकसभेत आमच्या वाट्याला कमी जागा आल्या तरी विधानसभेत आमच्या वाट्याला 40 हून अधिक जागा येतील."

हेही वाचा :

  1. महायुतीतील जागा वाटपावर नेत्यांच्या उघड वक्तव्यामुळं दिल्लीतील नेते नाराज? कोणत्या जागांचा तिढा कायम? - Lok Sabha Election 2024
  2. उमेदवारीवरून महायुती-मविआत नाराजीनाट्य; काय आहेत नाराजीची कारणं? - Lok Sabha Elections

ABOUT THE AUTHOR

...view details