महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांनी उपसलं बंडाचं हत्यार; विक्रमगडमधून निवडणूक लढवण्याचा निर्धार - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले, पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या पदरी निराशा आली आहे.

Prakash Nikam
प्रकाश निकम (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2024, 7:34 PM IST

पालघर : विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम हे प्रयत्न करत होते. परंतु महायुतीने येथून भाजपाच्या हरिश्चंद्र भोये यांना उमेदवारी दिल्यानं निकम नाराज असून त्यांनी बंडाचं निशाण फडकवलं आहे. "कोणत्याही परिस्थितीत विधानसभेची निवडणूक लढवायची आणि ती जिंकायचीच," असा निर्धार त्यांनी केलाय. विक्रमगड मतदारसंघातून निकम यांनी यापूर्वी दोनवेळा विधानसभेची निवडणूक लढवली होती. दोन्ही वेळा त्यांचा फार कमी मतांनी पराभव झाला. यावेळी या पराभवाचे उट्टे काढून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायची या निर्धारानं त्यांनी तयारी केली होती. परंतु, भाजपानं दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप निकम यांनी केलाय.

लोकसभेच्यावेळी दिला होता शब्द : निकम यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र, त्यावेळी भाजपानं विक्रमगड विधानसभा निवडणूक लढवा, त्यासाठी आम्ही मदत करू, असा शब्द दिल्याचं निकम यांनी सांगितलं. हा शब्द भाजपानं पाळला नाही, असं आता निकम सांगत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्या नावाची चर्चा होती. त्यावेळी त्यांनी शिवसेनाबरोबरच भाजपाकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही.

बैठकीत बोलताना प्रकाश निकम (ETV Bharat Reporter)

मतदारसंघावर दावा का? : निकम हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असून, त्यांनी विक्रमगड या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कामं केली आहेत. विक्रमगड आणि मोखाडा या दोन तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था शिवसेनेच्या ताब्यात आहेत. नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतीत शिवसेनेचं वर्चस्व असल्यामुळं हा मतदारसंघ शिवसेनेलाच सोडावा, अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली होती. हा मतदारसंघ जर शिवसेनेला आणि विशेषतः निकम यांना सोडला नाही, तर २०१९ ची पुनरावृत्ती होईल, असा इशाराही देण्यात आला होता. तरीही भाजपानं या मतदारसंघावरचा दावा न सोडल्यानं निकम नाराज असल्याची चर्चा आहे.

जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड या तीन तालुक्यात शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळं हा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा, अशी आमची आग्रही मागणी होती. या मतदारसंघात मी चांगलं काम केलं. आतापर्यंत वरिष्ठांच्या सांगण्यानुसार थांबलो. कितीवेळा थांबायचं यालाही काही मर्यादा आहेत. भाजपानं मला विधानसभेसाठी शब्द दिला होता, परंतु तो पाळला नाही. त्यामुळं आता कोणत्याही परिस्थितीत आणि कोणाच्याही दबावाची पर्वा न करता विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार आणि ही निवडणूक लढवून जिंकून दाखवणार आहे. -प्रकाश निकम, अध्यक्ष, जिल्हा परिषद पालघर

कार्यकर्ते संतप्त : निकम यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन चर्चा केली. तेव्हा कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना दिसून आल्या. महायुतीविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. त्यानुसार निकम यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीचा किती दबाव आला, तरी कोणत्याही परिस्थितीत माघार न घेता निवडणूक लढवणारच आणि जिंकणारच, असा निर्धार त्यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला.

निवडणुकीत तीन पर्याय : आपण सच्चा शिवसैनिक असून हक्कासाठी आणि न्यायासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं निकम यांनी सांगितलं. "कार्यकर्ते हे आपले दैवत असून, केवळ कार्यकर्त्यांचा शब्द हेच प्रमाण मानून आपण निर्णय घेणार. विक्रमगड मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आपल्यापुढे तीन पर्याय आहेत. त्यात बहुजन विकास आघाडी, नीलेश सांबरे यांची जिजाऊ संघटना आणि अपक्ष असे तीन पर्याय असून कार्यकर्ते जो निर्णय घेतील, त्या निर्णयानुसार आपण पर्यायांचा विचार करू," असे निकम यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. EXCLUSIVE : पालघरमधून राजेंद्र गावित यांची उमेदवारी निश्चित, सहा महिन्यांतच पुन्हा घरवापसी
  2. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर; 'या' अभिनेत्रीच्या पतीला उमेदवारी
  3. भाजपा आमदार पुत्र तुतारीवर फुंकणार रणशिंग

ABOUT THE AUTHOR

...view details